दीक्षाभूमीवर धम्मघोष मुक्तिदिनाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

दीक्षाभूमीवर धम्मघोष मुक्तिदिनाचा
नागपूर : 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी नागभूमीतील ती अभूतपूर्व घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धमूर्तीसमोर हात जोडून उभे होते. समोर उधाणलेला भीमसागर होता. बाबासाहेबांनी चंद्रमणींच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली आणि नंतर बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामिसह 22 प्रतिज्ञा समोरच्या लाखो जनतेला बौद्ध धम्म दिला. त्या दिवसाच्या आठवणीचे निमित्त साधून दीक्षाभूमीवर मुक्‍तिदिनाचा धम्मघोष करण्यात झाला. देशभरातून आलेले बौद्धबांधव या धम्मघोषाचे साक्षीदार बनले. लाखो अनुयायांनी दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले.

रविवारी सकाळपासूनच शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचशील ध्वज घेतलेल्या बौद्धबांधवांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली. लाखावर बौद्धांनी दीक्षाभूमीवर हजेरी लावून अख्खा दिवस येथे घालविला. उत्तर नागपुरातील रामकृष्ण लोहिया वाचनालयातील दोनशेवर विद्यार्थ्यांनी काढलेली रॅली नेत्रदीपक होती. ढोल-ताशा आणि जल्लोषाच्या वातावरणात उत्तर नागपुरातून निघालेल्या या रॅलीत डफाच्या थापेवर क्रांतिगीत गायले जात होते. रस्त्यातून क्रांतिगीतांचा गजर करीत पंचशील झेंडे खांद्यावर घेऊन ही रॅली दुपारी दीक्षाभूमीवर पोहोचली. सुबोध चहांदे यांच्यासह शेकडो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमी परिसरात "संग्राम मुक्तीचा आम्ही सारे घडवू...' या मुक्तिगीताचे स्वर कानावर येत होते. धम्मदीक्षा सोहळ्याच्या स्मृती जागविण्यासाठी दरवर्षी पावन दीक्षाभूमीवर लाखो बौद्धबांधव येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. स्मारकात स्थापित केलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन केले. हातात पंचशील ध्वज घेऊन घोषणा देत दीक्षाभूमीचा परिसर दणाणून टाकला. दीक्षाभूमीला भेट देणाऱ्या बौद्धबांधवांत दोन वर्षांच्या चिमुकल्यांपासून 90 वर्षांच्या आबालवृद्धांचा समावेश होता.
पुस्तकांची विक्रमी विक्री
महामानवाचे गुणगाण करणाऱ्या गीतांच्या सीडी आणि कॅसेट विक्रीच्या दुकानांवर एकच गर्दी दिसली. यापेक्षा जास्त दुकाने पुस्तकांची होती. असंख्य अनुयायांनी दीक्षाभूमी परिसरात सजलेल्या पुस्तकांच्या दुकानांमधून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या साहित्याची खरेदी केली. विशेष असे की, विविध भाषेतील पुस्तकांचे स्टॉल येथे होते. परिसरात यावेळी भोजनदानाचे स्टाल नव्हते; परंतु बौद्धबांधवांनी आपापल्यासोबत जेवणाचा डबा आणून परिसरात सहभोजन केले. पुढील तीन दिवस येथे पुस्तकांची विक्रमी विक्री होईल.
भीमबुद्ध गीतांची मैफल
बोधिवृक्ष तसेच दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारावर भीम आणि बुद्ध गीतांची मैफल सुरू होती. सकाळीपासूनच या परिसरात क्रांतिगीतांना उधाण आले होते. उपस्थित प्रत्येकाने क्रांतीचे उदयगीत असलेल्या दीक्षाभूमीवर गीत संगीतातून एक सुखद प्रसंग अनुभवला. आरिफ शेख या गायकाने "किती शोभला असता भीम नोटावर टाय अन्‌ कोटावर' हे गीत गाण्यास सुरुवात केली. या गीताच्या बोलांनी तेथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. यात 70 वर्षांच्या ज्येष्ठ महिलाही मागे राहिल्या नाहीत. सत्तरीतील महिलांनी उभे राहून या गीतातील शब्दांना अभिवादन केले. ही मैफल रात्री उशिरापर्यंत सुरू होती, हे विशेष.

Web Title: Dikshabhoomi news