यवतमाळच्या दीनदयाळ संस्थेला आदिवासी सेवा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

यवतमाळ : अत्यंत मागास समजला जाणारा पारधी समाज व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या उत्थानासाठी, कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या येथील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ संस्थेला महाराष्ट्र शासनाचा "आदिवासी सेवा संस्था पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला.

यवतमाळ : अत्यंत मागास समजला जाणारा पारधी समाज व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या उत्थानासाठी, कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या येथील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ संस्थेला महाराष्ट्र शासनाचा "आदिवासी सेवा संस्था पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला.
नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आदिवासीदिनानिमित्त झालेल्या समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री परिणय फुके, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला. संस्थेतर्फे प्रदीप वडनेरकर, विजय कद्रे, ज्योती चव्हाण, अभय मुजुमदार, नीलिमा मंत्री, डॉ. मनोज पांडे, शैलेश देशकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 50 हजार रुपये रोख, सन्मानपत्र व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार आदिवासी विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांना दिला जातो. दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ 1997 पासून पारधी समाजासोबत शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, संस्कार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्याचे उत्तम परिणाम आज दिसत आहेत. सुमारे 400 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याचे कार्य सुरू असून, शेकडो कुटुंबांना संस्थेने आधार दिला आहे. शेतकऱ्यांना शाश्वत शेती प्रकल्पाच्या माध्यमातून कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्याचे कामही संस्था करीत आहे. संस्थेच्या या उपक्रमांचा लाभ शेकडो आदिवासी बंधूंना होत आहे. यावेळी राज्यभरातून उपस्थित आदिवासी समूहांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आदिवासी नृत्य, कला आदींमुळे आदिवासी संस्कृती व परंपरेचा परिचय उपस्थितांना झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dindayal sanstha honoured by adivasi seva award