दिंडी अपघातातील मृतक वारकरी शेगावचे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

- दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसला
- संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज नामदास यांचा सुद्धा अपघातात मृत्यू
- कुटुंबावर कोसळला  दुःखाचा डोंगर 

खामगाव (जि.बुलडाणा) : दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घूसून झालेल्या भीषण अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला असून यातील अतुल महादेव आळशी (24) हे वारकरी श्री क्षेत्र शेगाव तालुक्यातील येऊलखेड या गावातील रहिवाशी आहेत. संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला असून अतुल महाराज हे त्यांचे परमशिष्य होते. 

अतुल महादेव आळशी (24)  हे 12 वीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर वारकरी संप्रदायात सहभागी झाले. ते आळंदी व अन्य ठिकाणी कीर्तन प्रवचन शिकले. सोपान महाराज हे त्यांचे गुरु होते. या दिवाळीत अतुल महाराज घरी आले व नंतर पालखीत सहभागी होण्यासाठी परत गेले. त्यांच्या धार्मिक कार्य, भजन कीर्तन आणि वारकरी संप्रदायात जास्त रस होता. त्यांच्याकडे दिड एकर शेती असून घरी आई बाबा, बहीण असा परिवार आहे. त्यांचे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. एकुलता मुलगा अपघाती वारल्याने आळशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जेसीबीचे ब्रेक निकामी
सर्व वारकरी चहापानासाठी एका ठिकाणी थांबले होते. त्याच ठिकाणी हा काही अंतरावर हा जेसीबी होती. जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर चालकाला आम्ही उतारावरून वाहन आणू नका अशी विनंती केली होती. परंतु अर्धा तास थांबल्यानंतर चालकाने पुन्हा जेसीबी सुरू केला. उतारावरून येत असताना त्यानं पहिले एका रिक्षाला धडक दिली आणि त्यानंतर काही वारकरी सुध्दा जेसीबीखाली आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dindi accident deceased was warkari at shegaon