दिनेश भुतडा यांना दणका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

नागपूर - आकोट येथे उघडकीस आलेल्या डब्बा व्यापार प्रकरणातील आरोपी दिनेश भुतडा यांना मंगळवारी (ता. 18) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. याप्रकरणी न्यायालयाने भुतडावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळत याचिका निकाली काढली. 

नागपूर - आकोट येथे उघडकीस आलेल्या डब्बा व्यापार प्रकरणातील आरोपी दिनेश भुतडा यांना मंगळवारी (ता. 18) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. याप्रकरणी न्यायालयाने भुतडावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळत याचिका निकाली काढली. 

अकोला जिल्ह्यातील आकोटमध्ये नरेश आणि दिनेश हे भुतडा बंधू सट्टा चालवायचे. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी 1 जून 2016 रोजी कस्तुरी कमोडिटीज ऍण्ड शेअर्स या भुतडा यांच्या प्रतिष्ठानावर छापा टाकला. या वेळी भुतडा बंधू डब्बा व्यापार करीत असल्याचे उघडकीस आले. यानंतर अकोला पोलिसांनी नागपूर पोलिसांची मदत घेत भुतडा बंधूंविरुद्ध गुन्हा नोंदविला. यापैकी दिनेश भुतडा याने गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला. या अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे सांगत न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याची विनंती फेटाळली. दिनेश भुतडा नोंदणीकृत शेअर्स व्यापारी आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले. तो पोलिसांना तपासात सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला. 

भुतडा यांच्याविरुद्ध ठोस पुरावे असून, गुन्हा रद्द करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. प्रकरणातील इतर काही बाबी लक्षात घेत न्यायालयाने भुतडा यांची विनंती नाकारली. यापूर्वी दिनेश भुतडा याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी न्यायालयाने शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते, येथे उल्लेखनीय. याप्रकरणी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील एम. जे. खान यांनी बाजू मांडली. 

Web Title: Dinesh bhutada case