esakal | रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धावत्या रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रारही नोंदविली. अन्य प्रवाशांनीसुद्धा प्रशासनाच्या नावाने शंख करीत शिव्यांची लाखोली वाहिली.
12102 हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्‍वरी एक्‍स्प्रेस रविवारी रात्री नियोजित वेळेत रवाना झाली. पहिले स्टेशन येण्यापूर्वीच बी-3 क्रमांकाच्या डब्यामधील दोन्ही बाजूंच्या शौचालयांमध्ये पाणी येणे बंद झाले. याच डब्यातून शर्मिला सेनसागर या मुलासह प्रवास करीत होत्या. त्यांनी याबाबत सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी टीटीकडे बोट दाखविले. यामुळे टीटीलासुद्धा पाणी नसल्याचे सांगितले. बिलासपूर स्थानकावर पाणी भरले जाईल, असे सांगून टीटीने वेळ मारून नेली. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही गाडी बिलासपूर स्थानक सोडून पुढे रवाना झाली. मात्र, शौचालयात पाणी नव्हते. यामुळे अन्य प्रवाशांसोबतच शर्मिला सेनसागर यांनी त्रागा व्यक्त करीत जाब विचारला. बी-3 क्रमांकाच्या डब्यात जाऊन बघितले असता तिथेसुद्धा पाणी नव्हते. कर्मचारी, टीटीची कानउघाडणी केली. यानंतर अचानक नळाला पाणी आले. याचा अर्थ स्पष्ट होता. टाकीत पाणी असले तरी ते बंद करून ठेवण्यात आले होते. पाणी आल्यावरसुद्धा फ्लशर मात्र योग्यरीत्या काम करीत नसल्याची त्यांची तक्रार आहे. ही गाडी नागपूर स्थानकावर पोहोचल्यानंतर सेनसागर यांनी उपस्टेशन पाणी बंद का करून ठेवले, असा सवाल उपस्थित करीत लेखी तक्रार नोंदविली.
हा तर नित्याचाच प्रकार
कामाच्या निमित्ताने दर आठवड्यातच हावड्याला जाणे-येणे करावे लागते. या मार्गावर नेहमीच अशीच अवस्था असते. पाणीच राहत नसल्याने शौचालये अस्वच्छ असतात, मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत असल्याचे शर्मिला सेनसागर यांनी सांगितले. रेल्वेत दोन स्वच्छता कर्मचारी असतात. मग, शौचालयात पाणी आहे की नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी त्यांची आणि प्रशासनाची नाही काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

loading image
go to top