शिष्या पडली गुरूवर भारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

नागपूर : गुरूवर मात करण्याचा आनंद शिष्यासाठी काही वेगळाच असतो. नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने गोवा येथे संपलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिचे एकेकाळचे गुरू व आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुखला पराभूत करून हा आनंद साजरा केला. 14 वर्षीय दिव्याने दहाव्या व शेवटच्या फेरीत देशमुखला पराभूत केले. दिव्याने दहा फेऱ्यांअखेर सहा गुणांची कमाई करून संयुक्‍तपणे पाचवे व एकूण 72 वे स्थान पटकाविले. भारतीय खेळाडूंमध्ये दिव्याने सर्वोत्तम कामगिरी बजावली. 50 वर्षीय अनुपने दहा फेऱ्यांमध्ये पाच गुण मिळवून 113 वे स्थान मिळविले.

नागपूर : गुरूवर मात करण्याचा आनंद शिष्यासाठी काही वेगळाच असतो. नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने गोवा येथे संपलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिचे एकेकाळचे गुरू व आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुखला पराभूत करून हा आनंद साजरा केला. 14 वर्षीय दिव्याने दहाव्या व शेवटच्या फेरीत देशमुखला पराभूत केले. दिव्याने दहा फेऱ्यांअखेर सहा गुणांची कमाई करून संयुक्‍तपणे पाचवे व एकूण 72 वे स्थान पटकाविले. भारतीय खेळाडूंमध्ये दिव्याने सर्वोत्तम कामगिरी बजावली. 50 वर्षीय अनुपने दहा फेऱ्यांमध्ये पाच गुण मिळवून 113 वे स्थान मिळविले. सुरुवातीला माघारलेल्या सृष्टी पांडेनेही (3 गुण) उत्तम धुंगेलला पराभूत करून स्पर्धेचा शेवट गोड केला. अन्य सामन्यात शैलेश द्रविडने (6 गुण) ताजिकिस्तानचा आंतरराष्ट्रीय मास्टर महंमद खुशेंकोजेव्हला बरोबरीत रोखले. महिला चेस मास्टर मृदुल डेहनकर, संकल्प गुप्ता, वैभव राऊत आणि इंद्रजित महिंद्रकरला पराभवाचा सामना करावा लागला. मृदुलला (4 गुण) तमिळनाडूच्या आर. विशाल सिबीकडून, नुकताच आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पटकाविणाऱ्या संकल्पला (5.5 गुण) तमिळनाडूचा ग्रॅण्डमास्टर एम. आर. वेंकटेशकडून, वैभवला (3 गुण) ओडिशाच्या शेखर साहूकडून आणि इंद्रजितला (5 गुण) आंध्र प्रदेशची प्रियांका नुटक्‍कीकडून पराभव पत्करावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The disciple fell upon the master