सिंदखेडराजातील उपोषणाची सर्वत्र चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

बुलडाणा जिल्ह्यातील इतिहासात प्रथम अशा प्रकारचे उपोषण सोडविण्याचा प्रकार झाला असून, एकाच मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दोन्ही उपोषणकर्त्यांपैकी एकाला माजी तर दुसर्‍याला आजी आमदारांच्या हस्ते उपोषण सोडविण्याचा प्रसंग आला. उपोषणकर्ते दोन तर उपोषण सोडविणारेही दोन असल्यामुळे या उपोषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

सिंदखेडराजा : देऊळगावराजा तहसीलदार यांनी कारण नसताना दंड ठोठावला असल्यामुळे त्याबाबत सिंदखेडराजा येथील उपविभागीय कार्यालयासमोर 12 जुलैला टिप्पर व ट्रॅक्टरमालकांनी उपोषण सुरू केले होते. सदर उपोषण पाच दिवस चालले. अखेर 16 जुलैला उपोषण सोडविण्यात आले. परंतु, सदर उपोषण सोडविण्यासाठी आजी व माजी आमदारांना चक्क उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार मंडपात दाखल व्हावे लागले हे विशेष.

वेगवेगळ्या मागणीसाठी न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिक हे उपोषण, आंदोलन करत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सिंदखेडराजा येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आलेले उपोषण हे चर्चेचा विषय ठरले आहे. निमगाव गुरू येथील संतोष शिवहरी धारे व दत्तू रामकिसन गायकवाड हे दोघे ही तलाठी व तहसीलदारांनी केलेल्या अन्यायाला विरोधात आमरण उपोषणाला बसले होते. मात्र, प्रशासकीय पातळीवरून उपविभागीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अखेर सोमवारी (ता.16) माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सदर प्रकारची सविस्तर माहिती घेऊन चर्चा करून उपोषणाला बसलेल्या दोघांपैकी केवळ दत्तू रामकिसन गायकवाड यांचे उपोषण सोडविले. त्यानंतर ते तेथून निघून गेले. 

मात्र, दुसर्‍या उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले नाही. दुसरे उपोषणकर्ते संतोष शिवहरी धारे यांनी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याहस्ते रात्री 10 वाजता उपोषण सोडविले. 

एकच उपोषण, वेगवेगळी सोडविले

बुलडाणा जिल्ह्यातील इतिहासात प्रथम अशा प्रकारचे उपोषण सोडविण्याचा प्रकार झाला असून, एकाच मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दोन्ही उपोषणकर्त्यांपैकी एकाला माजी तर दुसर्‍याला आजी आमदारांच्या हस्ते उपोषण सोडविण्याचा प्रसंग आला. उपोषणकर्ते दोन तर उपोषण सोडविणारेही दोन असल्यामुळे या उपोषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. 

Web Title: Discussed everywhere in the Sindkhedaraj fasting