वर्षभर मांडला जातो सोयीनुसार बदल्यांचा खेळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नागपूर - वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचा अफलातून फंडा आहे. कधीही कोणाची बदली होईल, असा इशारा देण्यासाठी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्यांची नावे मागविण्यात येतात. कधी थेट बदलीचे आदेश धडकतात. बदली होताच महिनादोन महिन्यात रद्द होते. मेडिकल, सुपर व मेयोत बदल्यांचा खेळ सोयीनुसार रंगत असल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात सुरू आहे. 

नागपूर - वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचा अफलातून फंडा आहे. कधीही कोणाची बदली होईल, असा इशारा देण्यासाठी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्यांची नावे मागविण्यात येतात. कधी थेट बदलीचे आदेश धडकतात. बदली होताच महिनादोन महिन्यात रद्द होते. मेडिकल, सुपर व मेयोत बदल्यांचा खेळ सोयीनुसार रंगत असल्याची जोरदार चर्चा मेडिकल वर्तुळात सुरू आहे. 

नियमानुसार एप्रिल ते जून हा बदल्यांचा काळ. परंतु, वैद्यकीय शिक्षण विभागात बदल्यांचा नेम नाही. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्यांची बदली होत नाही. अवघे वर्ष दोन वर्षांपूर्वी बदलून आलेल्यांची पुन्हा बदली होते. नुकतेच दीड महिन्यांपूर्वी मेडिकलच्या रेडिओलॉजी विभाप्रमुख डॉ. आरती आनंद यांची गोंदिया मेडिकल कॉलेजमध्ये बदली झाली. त्या रुजू झाल्या आणि काय आश्‍चर्य?, पुन्हा गोंदियातून बदलून मेडिकलमध्ये परत आल्या. डॉ. आरती आनंद यांची बदली करणे आणि महिनाभरात रद्द करणे हा बदलीच्या खेळात संशय निर्माण करणारी घटना आहे. 

डॉ. आरती आनंद परत आल्या. त्यांच्या जागेवर सुपर स्पेशालिटीमधील श्रीमती डॉ. सोनवणे यांची गोंदियात बदली झाली. डॉ. सोनवणे विदेशवारी करीत आहेत. विदेशवारीवर असतानाच त्यांना कार्यमुक्त केल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी मेडिकलच्या त्वचारोग विभागातील, मेडिसीन व इतर डॉक्‍टरांच्या बदल्या गोंदियात झाल्या आहेत. ते सारेच्या सारे बदलून आले आहेत. बदली करणे आणि त्या रद्द करणे हा एकच उद्योग या विभागाचा असल्याच्या चर्चेला येथे उधाण आले आहे. विशेष असे की, मेडिकलमध्ये अभ्यागत मंडळाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री व मंडळाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी डॉक्‍टरांच्या बदल्या करू नका किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार बदली द्या, असे सुनावले होते. यानंतरही वर्षभर बदल्यांचा खेळ रंगलेलाच असतो. 

यादीचे काय झाले? 
15 वर्षे एकाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सेवा देणाऱ्या सहयोगी प्राध्यापक डॉक्‍टरांची यादी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी 10 महिन्यांपूर्वी मागवली होती. मेयो, मेडिकलसह सुपर स्पेशालिटीतून शंभरावर सहयोगी प्राध्यापकांची यादी तयार झाली. यादीतील प्रत्येक सहयोगी प्राध्यापकाला बदलीचे संकेत दिले. इच्छा असलेल्या ठिकाण लिहून पाठविण्याची संधी दिली. परंतु, पुढे दहा महिने लोटून गेले. यातील एकाही सहयोगी प्राध्यापकाची बदली झाली नसल्याची चर्चा येथे रंगली आहे. 

Web Title: Discussion about the medical, super and Mayoos transfers