आंबेडकरांसोबत चर्चा बंद केली नाही

ajit pawar
ajit pawar

आंबेडकरांसोबत चर्चा बंद केली नाही
नागपूर : समविचार आणि धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याकरिता सर्वांसोबतच चर्चा केली जात आहे. एमआयएमसोबत युती केली असली तरी ऍड. प्रकाश आंबेडकरांसोबत आम्ही चर्चा बंद केलेली नाही. ते आघाडीत येतील, अशी आशा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केली. एमआयएम धर्मनिरपेक्ष पक्ष नसल्याने त्यांचा आघाडीत समावेश केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. सर्वांना आपापल्या ताकदीचा अंदाज आला आहे. कोणी चाळीस, पन्नासच्या वर पोचले नाही. त्यामुळे यावेळी आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही कॉंग्रेसने घेतला आहे. मतांची वजाबाकी होऊ नये आणि भाजप-शिवसेनेला फायदा होऊ नये म्हणून इतरांनाही सोबत घेण्याचे आम्ही ठरविले आहे. आघाडी निश्‍चित झाल्यानंतर जागा वाटप केले जाईल. ज्याची जेथे व जेवढी ताकद त्यानुसार जागा वाटप करताना विचार केला जाईल. केवळी मागील निवडणूक कोणी लढली, याचा विचार केला जाणार नाही. चार वर्षांत पक्षाच्या कामगिरीचाही विचार केला जाईल.
लोकसभा आधी असल्याने 48 जागांच्या वाटपावर चर्चा केली जाईल. त्याकरिता दोन्ही कॉंग्रेसचे अध्यक्ष व विधानसभा व विधान परिषदेतील नेत्यांची नेमणूक केली आहे. ते स्वतंत्रपणे विविध पक्षांसोबत बोलणी करीत आहेत. दोन ऑक्‍टोबरला आघाडीसंदर्भात बैठक होणार आहे. त्यात बरेच काही स्पष्ट होणार आहे.
मनसेकडे व्होटबॅंक
मनसेला आघाडीत घेण्यास कॉंग्रेसचा विरोध आहे. या प्रश्‍नावर मनसेचेही महाराष्ट्रात आमदार आणि खासदार होते, त्यांच्याकडे काही टक्के मते आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो याकडे लक्ष वेधून पवार यांनी कॉंग्रेसला टोला हाणला.
ईव्हीएमवर विश्‍वास
ईव्हीएमवर आपला विश्‍वास आहे. ते मॅनेज करता आले असते तर भाजपचा कर्नाटक, पंजाबमध्ये पराभव झाला नसता. अलीकडेच भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. लोकशाहीत पराभव झाला असला तर तो मान्य केला पाहिजे. लाटेत उलथापालथ होत असते. ती विरली की सुरळीत होते, असेही अजित पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com