दिवसभर बिबट्याच्या मृत्यूची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

भंडारा : दोन दिवसांत दोन वाघांचा मृत्यू झाल्यामुळे कऱ्हांडला-उमरेड-पवनी अभयारण्याकडे लक्ष वेधले गेले. मंगळवारी आणखी एक बिबट व काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. याबाबत कोणाकडूनही दुजोरा मिळाला नाही. मात्र, वाघ व इतर प्राण्यांच्या मृत्यूसंदर्भातील पुरावे मिळवण्यासाठी अभयारण्यात युद्धस्तरावर शोधमोहीम सुरूच होती.

भंडारा : दोन दिवसांत दोन वाघांचा मृत्यू झाल्यामुळे कऱ्हांडला-उमरेड-पवनी अभयारण्याकडे लक्ष वेधले गेले. मंगळवारी आणखी एक बिबट व काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. याबाबत कोणाकडूनही दुजोरा मिळाला नाही. मात्र, वाघ व इतर प्राण्यांच्या मृत्यूसंदर्भातील पुरावे मिळवण्यासाठी अभयारण्यात युद्धस्तरावर शोधमोहीम सुरूच होती.
कऱ्हांडला-उमरेड-पवनी अभयारण्यातील चिचगाव बिटच्या कंपार्टमेंट नंबर 226 मध्ये रविवारी चार्जर हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनानंतर विषबाधेचा संशय व्यक्त केला होता. या घटनेमागील कारण शोधण्यासाठी वन्यजीव विभागाच्या पथकाने शोधमोहीम राबविली. त्यात सोमवारी सकाळी नागबोडी परिसरात राई वाघिणीचा मृतदेह आढळला. जवळच रानडुकर व मसन्याउदही मृतावस्थेत आढळले. याप्रकाराची गंभीर दखल घेत वन्यजीव विभागाने श्‍वानपथकाच्या मदतीने शोध सुरू केलेला आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.
मंगळवारी कऱ्हांडला जंगलात आणखी एक बिबट, मोर व काही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा जिल्ह्यात पसरली. त्याबाबत कोणत्याही सूत्राने पुष्टी केली नाही. सायंकाळी "सीट'चे शाहीद खान यांनी फोनवरून बोलताना ही अफवा असल्याचे सांगितले. मात्र, दोन दिवसांत झालेल्या वाघांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी विभागाची मोहीम सुरूच आहे, असे त्यांनी सांगितले.

गाइड्‌सला रोजगाराची चिंता
उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात हमखास वाघ दिसतो म्हणून पर्यटक येतात. त्यामुळे तीन महिला व 12 पुरुष गाइड्‌सला रोजगार मिळतो. आता या अभयारण्यात वाघ नसल्याने पर्यटक येणार नाही. त्यामुळे गाइड म्हणून कार्यरत असलेल्या सर्वांना बेरोजगार व्हावे लागेल, अशी चिंता नामदेव बोडखे, छगन डहारे व पंकज देशमुख यांनी व्यक्त केली.

अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यूचे प्रकरण लागोपाठ उघड झाले. यात नेमके काय झाले, याचा उलगडा होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या रक्षणासाठी विभागाला उपाययोजना करता येईल.
- शाहीद खान, सचिव, सेव्ह इको ऍण्ड टायगर संघटना, भंडारा.

Web Title: Discussion of death of leopard all day