काम वाटपावरून जिल्हा परिषदेत गोंधळ, पोलिसांना पाचरण करून मार्ग काढण्याचा प्रयत्न

dispute over work distribution in amravati zp
dispute over work distribution in amravati zp

अमरावती : यादी अंतिम करूनसुद्धा आपल्या वाट्याची कामे बांधकाम विभागाकडून ग्रामपंचायतींकडे वळती करण्यात आल्याच्या मुद्यावरून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी बुधवारी (ता.31) जिल्हापरिषदेत चांगलाच गोंधळ घातला. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर फायली आपटण्यात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करावे लागले. या घटनेनंतर जिल्हापरिषदेत चांगलाच तणाव निर्माण झाला होता. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील जवळपास चार हजारांवर अभियंत्यांची नोंद सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून करण्यात आली असून नियमानुसार कामवाटप समितीची सभा घेऊन त्यांना  33 टक्के कामे वितरित करावी लागतात. मात्र, मागील एक वर्षापासून समितीची सभाच झाली नाही. 31 मार्चला प्रशासनाकडून सभेचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी 179 कामांची यादी जाहीरसुद्धा करण्यात आली. ही कामे आपल्यालाच मिळणार, या आशेवर सुशिक्षित बेरोजगार अभियंता जिल्हा परिषदेत दाखल झालेत. दुपारी दोन वाजताची वेळ देण्यात आली असतानासुद्धा यादीच अद्यावत करण्यात आली नाही. तसेच 179 कामांपैकी अनेक कामे परस्पर ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचा आरोप करीत अभियंत्यांनी एकच गोंधळ सुरू केला. सभागृहात चांगलाच गदारोळ झाल्यानंतर अभियंत्यांनी आपला मोर्चा उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांच्या कक्षाकडे वळविला. त्याठिकाणी अधिकारी व अभियंत्यांमध्ये चांगलाच वाद झाला. काही मंडळींनी आक्रमक हालचाली सुरू केल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. यावेळी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नीला वंजारी यांनी अभियंत्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर कामवाटप समितीची सभा पुन्हा घेण्यात येऊन त्यामध्ये नियोजनातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

प्रशासनाकडून अंदाजे 179 कामांची यादी काढण्यात आली होती, ती अंतिम झाली नाही. नियमानुसार या यादीमधील कामेसुद्धा मागणीनुसार ग्रामपंचायतींना दिली जाऊ शकतात. मात्र, सुशिक्षित बेरोजगार अभियंते काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आपण त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
-तुकाराम टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.  

कामवाटप समितीची सभा नियमित घेतली जात नाही. बुधवारी ती घेतली तर त्यामध्ये सुद्धा आमच्या वाट्याची कामे ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविला आहे. दुपारी दोनची सभेची वेळ असतानाही प्रशासनाकडून काहीच तयारी करण्यात आली नाही, याद्या अंतिम नव्हत्या. त्यामुळे आम्ही नियमानुसार कामे देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, अधिकाऱ्यांनी आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरे दिलीत.
- राहुल सांडे, जिल्हाध्यक्ष, कंत्राटदार महासंघ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com