#Sunday Special, video : जीवनवाहिनीच बंद, आता होणार हाल 

नरेश शेळके 
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

  • अनेकांचे आर्थिक गणित बिघडणार 
  • माल इतरत्र विकण्यासाठी पर्याय शोधावा लागेल 
  • खासगी बस कंपनीचे लोक भाडेवाड करतील 
  • गौतम बॅनर्जी यांनी केले मार्गाचे निरीक्षण 

नागपूर : नागपूर-नागभीड ही नॅरोगेज ट्रेन म्हणजे भाजीपाला, दही, दूध विकणारे, शिक्षणासाठी खेड्यातून कुही, उमरेड, भिवापूर, नागभीड येथे येणारे विद्यार्थी आणि नोकरीनिमित्त नागपूर येथून प्रवास करणारे यांच्यासाठी जीवनवाहिनीच होती. आता ही जीवनवाहिनीच बंद होणार असल्याने त्यांचे हाल होणार आहेत. प्रवासाठी त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. 

कुही, उमरेड, भिवापूर, नागभीड ही गावे राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने प्रवासाची पुरेशी सोय असली तरी आजूबाजूच्या अनेक छोट्या-मोठ्या गावात अजूनही प्रवाशाची सोय नाही. रेल्वे हा एकमेव पर्याय होता. तसेच गावातील लोकांची आर्थिकस्थिती बेताचीच असल्याने त्यांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे होते. त्यातच भाजीपाला, दही, दूध विकण्यासाठी इतवारी स्थानक सोयीचे होते.


स्थानकावर विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी 

आता या शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना आपला माल इतरत्र विकण्यासाठी पर्याय शोधावा लागेल. त्यासाठी बस, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल आणि त्यासाठी अधिक पैसा मोजावा लागेल. त्यामुळे साहजिकच त्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. 

Image may contain: sky, tree, plant, outdoor, water and nature

पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या

ट्रेन बंद होणार असल्याने केम पळसाड येथील योगिता नरड, शिवानी मांगे, स्विटी वैद्य, नेहा बागडे, नीलिमा चरडे, पायल साखरकर यांच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट दिसत होती. कारण, त्या रोज शिक्षणासाठी केम पळसाड ते कुही असा प्रवास करीत होत्या. आता कुहीला कसे पोहोचायचे, हा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. दोन महिन्यांनंतर परीक्षा होणार आहे. त्यामुळे बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागणार त्यामुळे साहजिकच अधिक पैसे मोजावे लागतील, ही चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे राज्य सरकारने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली. 

आता 600 ते 1,200 रुपये लागतील

केम पळसाड, तितूर, कारगाव, मांगली, भुयार, पवनी रोड, टेम्पा येथील अनेक विद्यार्थ्यांना आता महिन्याला 200-300 रुपये लागतात. ही ट्रेन बंद झाल्यावर कुही, उमरेड, भिवापूर आणि नागभीड येथे शिक्षणासाठी जाण्यासाठी 600 ते 1,200 रुपये लागतील असा अंदाज आहे. 

Image may contain: 4 people, people standing and outdoor
रेल्वेचे कर्मचारी 

ब्रॉडगेज 
2013-14 मध्ये ब्रॉडगेज प्रकल्पला मान्यता 
एकूण खर्च (अपेक्षित) : 992 कोटी 
673.84 कोटी सिव्हिल कामावर होणार खर्च 
182.42 कोटी विद्युत कामावर खर्च 
65.74 कोटी सिग्नल व्यवस्थेवर खर्च 
प्रत्यक्ष कामाला सुरुवात : 1 डिसेंबर 2019 
पूर्ण करण्याचा कालावधी : किमान 21 महिने तर कमाल ः 36 महिने. 

 

Image may contain: 3 people, people standing and indoor

खासगी वाहनधारकांची मनमानी वाढणार

ही ट्रेन बंद झाल्याने या भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकऱ्यांना रस्ता मार्गाने प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. अनेक गावे जंगलात असल्याने तिथे अजूनही एसटी पोहोचत नाही. त्यामुळे अशा लोकांना आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे नागपूर येथे येण्यासाठी एसटीसोबत खासगी बसेस हा पर्याय आहे. या संधीचा फायदा घेऊन खासगी बस कंपनीचे लोक भाडेवाड करतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुढील किमान दोन वर्षे या भागात अवैध वाहतुकीला ऊत येईल, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Image may contain: outdoor

व्यवस्थापकांचा दौरा

इतवारी-नागभीड हा नॅरोगेज मार्ग बंद होऊन लवकरच ब्रॉडगेज मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांनी संपूर्ण मार्गाचे निरीक्षण केले. प्रत्येक रेल्वेस्थानाकावर उतरून त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तेथील व्यवस्थेची पाहणी केली. सिग्नल व्यवस्था, फलाटाची स्थिती, मार्गावर येणारे पूल, विद्युतीकरण करताना येणाऱ्या अडचणी या विषयी माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यासुद्धा उपस्थित होत्या. 

 

Image may contain: 1 person, smiling
संजय गजपुरे

विकासाला चालना मिळेल
गेल्या 25 वर्षांपासून नागपूर-नागभीड मार्ग ब्रॉडगेज व्हावा यासाठी पाठपुरावा करीत होतो. त्यापूर्वीही म्हणजे 1952 पासून ही मागणी सुरू होती. अखेर या लढ्याला यश प्राप्त झाले. हा मार्ग ब्रॉडगेज झाल्याने या परिसरातील विकासाला चालना मिळेल. येथील व्यापाऱ्यांना लवकरात-लवकर नागपूर किंवा इतर मोठ्या शहरातील बाजारपेठेत आपला माल पोहोचविता येईल. नॅरोगेज ट्रेनसोबत नागभीडकरांच्या भावना, आठवणी जुळल्या आहेत. या आठवणींसह आम्ही ब्रॉडगेजचे स्वागत करणार आहोत. 
- संजय गजपुरे, 
विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य, नागभीड.

कमाई बंद होण्याची भीती
शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाल्याचे लागवड करून ते इतवारीच्या बाजारात विकत होतो आणि ही नॅरोगेज ट्रेन इतवारीसाठी सोयीस्कर होती. आता ट्रेन बंद होत आहे आणि भामेवाडा येथून नागपूरसाठी प्रवासाचे साधन नसल्याने हवालदील झालो आहे. कसेतरी रोज 200-300 रुपये कमवत होतो. आता ही कमाई बंद होण्याची भीती आहे. 
- सिद्धार्थ पाटील, 
शेतकरी, भामेवाडा, कुही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distress caused by train closure