जिल्हा आपत्ती व्यवस्थापन म्हणते,शाळा उघणार नाहीच... 

file photo
file photo

अमरावती : जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने शाळा उघडण्याच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. जुलैमध्ये शाळा उघडण्याची स्थिती तूर्त नाही, शाळा बंदची स्थिती अद्यापही कायम आहे, असे आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी (ता. 29) स्पष्ट केले. 

शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभा शाळांमध्ये पार पडलेल्या आहेत. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पाल्यांना शाळेत पाठविण्याची जोखीम उचलण्यास पालक तयार नाहीत. यापूर्वी शासनाकडून ज्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या होत्या, त्यात शाळा जुलैमध्ये सुरू करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेता येईल, असे नमूद आहे. मात्र जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने शाळांमध्ये नियमित अध्यापनासाठी कोणताही आदेश निर्गमित केलेला नाही. मात्र काही वर्गांसाठी ऑनलाइन पद्धतीने अध्यापनाचे कार्य शाळांना करता येईल, अशी पुस्तीही जिल्हाधिकाऱ्यांनी जोडली. 1 जुलैपासून अनलॉक-टू घोषित झाला तरी सद्यःस्थितीतील नियमांमध्ये फारसा बदल राहणार नाही, असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

स्थानिक अशोकनगर येथे कोरोनाबाधित आढळण्याचा संबंध रामपुरी कॅम्पशी आहे, या दोन्ही भागात आतापर्यंत 12 ते 13 रुग्ण आढळलेले आहेत. श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटलमध्ये आढळलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीवर नागपूर येथे उपचार केले जात आहेत. 
मध्यवर्ती कारागृहात जामीनावर सुटलेली अचलपूर तालुक्‍यातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळलेली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. बडनेरा मार्गावरील आयसोलेशन दवाखान्यात कोरोना चाचणीसाठी नमुने संकलन केंद्र सुरू झालेले आहे तर महापालिका व जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या आरोग्य तपासणी सर्वेक्षणातून सारी व इलीचे रुग्ण समोर येत आहेत. जिल्हा कोविड रुग्णालयातील भोजनाच्या दर्जात सुधारणा झालेली आहे. पाण्याच्या व्यवस्थेसाठी विहिरीवर पंप बसविण्याची व्यवस्था केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

होमिओपॅथीमध्ये कोविड रुग्णालय 
बडनेरा मार्गावरील जवाहरलाल नेहरू होमिओपॅथीक महाविद्यालय व इन्स्टिट्यूटच्या कोविड रुग्णालयात डॉक्‍टरांची चमू नियुक्त करण्यात आलेली आहे. सद्यःस्थितीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण येत्या दोन-तीन दिवसांत कायम राहिल्यास होमिओपॅथीक इन्स्टीट्यूटमध्ये कोविड रुग्णालय सुरू केले जाईल. 

आणखी एका मशीनची ऑर्डर 
श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेत आणखी एका नवीन मशीनची ऑर्डर देण्यात आलेली आहे. सध्या दिवसाला 250 नमुन्यांची तपासणी होत आहे, मशीन वाढविल्याने चाचणीचे प्रमाण वाढेल. मात्र ही यंत्रणा उभी करण्यास किमान दोन तीन आठवड्याचा अवधी लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com