जिल्ह्यात पेरणी निम्म्याच क्षेत्रावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

नागपूर : यंदा पाऊस विलंबाने आला. याचा फटका पेरणीला बसला आहे. आतापर्यंत फक्त 52 टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक 65 टक्‍के क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे.

नागपूर : यंदा पाऊस विलंबाने आला. याचा फटका पेरणीला बसला आहे. आतापर्यंत फक्त 52 टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक 65 टक्‍के क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे.
जिल्ह्यात खरिपाचे एकूण 5 लाख 7 हजार 600 हेक्‍टर क्षेत्रावर नियोजन आहे. त्यातील 4 लाख 79 हजार 210 हेक्‍टर क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. कापसाचे एकूण नियोजित क्षेत्र हे 2 लाख 25 हजार हेक्‍टर आहे. सोयाबीनचे 1 लाख हेक्‍टर व तांदळाचे 94 हजार 200 हेक्‍टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले होते. परंतु, हवामान खात्याचा हा अंदाज चुकला. पावसाचे आगमन यंदाही उशिराच झाले. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली. जुलै महिना पावसाचा असतो. परंतु, अद्याप पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच गेल्या सात दिवसांपासून विदर्भात तुलनेने फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली आहे. तरीसुद्धा आजवर म्हणजेच 11 जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी 296.4 मिलिमीटर इतका पाऊस पडत असतो. मात्र, यंदा 1 जून ते 11 जुलैपर्यंत केवळ 225 मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत सुमारे 24 टक्‍क्‍यांनी कमी आहे. आजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या 52.17 टक्के म्हणजेच 2 लाख 50 हजार 020 हेक्‍टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कापसाची 1 लाख 64 हजार 127 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे लागवड क्षेत्र घटले आहे. अद्याप केवळ 48 हजार 827 हेक्‍टरवरच पेरणी झाली आहे. तुरीची 33 हजार 237 हेक्‍टरवर तर ज्वारीची 1306.63 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. धानाची 2524.63 हेक्‍टर तर डाळींची 33 हजार 744 हेक्‍टर पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district sown news