बुलडाणा ZP : कॉंग्रेस-राष्ट्रवादीला धक्का

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे तेवीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांना शेगाव व संग्रामपूर तालुक्‍यात प्रत्येकी एक अशा दोनच जागांवर विजय मिळविता आला आहे.

बुलडाणा ः स्थापनेपासून कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेसाठी ही निवडणूक सत्तांतर घडविणारी ऐतिहासिक ठरली. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना एकत्र आल्यास त्यांना बहुमत मिळणार आहे.

युतीने सत्ता स्थापन केल्यास त्यांना अपक्ष किंवा इतर कुणाचीही मदत घेण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय किंवा शेतीमालाच्या पडलेल्या हमीभावापेक्षा ग्रामीण जनतेने भाजपच्या केंद्र आणि राज्यातील कारभारावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. या निवडणुकीत चोवीस जागा जिंकून भाजप हा सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. त्याखालोखाल कॉंग्रेसने चौदा, शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आठ, भारिप बहुजन महासंघाने दोन व अपक्षांनी तीन जागांवर कब्जा मिळविला आहे.

विशेष म्हणजे ज्या भागाचे नेतृत्व कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर करीत आहेत त्या खामगाव तालुक्‍यात त्यांनी दिलेला शतप्रतिशत भाजपचा नारा तंतोतंत खरा ठरविला आहे. या तालुक्‍यातील सातपैकी सातही जागा भाजपने जिंकून विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना या निकालाने सणसणीत चपराक बसली आहे. गेल्या वेळी खामगाव मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्व असल्याने वर्षाताई वनारे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेवर माजी आमदार सानंदा यांचे वर्चस्व होते. ते आता मोडीत निघाले आहे.

दिग्गजांना धक्का
*खासदार जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांचा पराभव
*शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांचा पराभव
*घाटावरील जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या पत्नीचा विजय
*कॉंग्रेसच्या दोन माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचा पराभव
*जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा हिंदुत्ववादी पक्षांकडे सत्ता

Web Title: ditch to ncp, congress in budhana zp