चला...खरेदी करून लावूया हातभार

नागपूर - स्वहस्ते तयार केलेल्या विविध वस्तूंसह दिव्‍यांग बांधव.
नागपूर - स्वहस्ते तयार केलेल्या विविध वस्तूंसह दिव्‍यांग बांधव.

नागपूर - दिवाळीच्या पर्वावर घरोघरी दिव्यांची खरेदी केली जाते. पणत्या, आकाश दिव्यांपासून फराळाचे साहित्य, रांगोळी, तोरण खरेदी केली जाते. यंदाच्या दिवाळीत दिव्यांग बांधवांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या वस्तूंची विक्रीही केली जाणार आहे. या वस्तूंची खरेदी करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी त्यांच्या मेहनतीची किंमत करावी.

येत्या २ नोव्हेंबरपासून रामदासपेठेतील पूर्णचंद्रराव बुटी सभागृहात दिव्यांग बांधवांच्या वस्तूचे प्रदर्शन लावण्यात येईल. दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनातून खरेदी करून त्यांना समान संधी देण्याचे आवाहन आपण फाउंडेशन बहुद्देशीय संस्था, एस. के. व्ही. शिक्षण संस्था आणि जिल्हा अपंग व पुनर्वसन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. 

विद्यापीठ वाचनालयाच्या बाजूला असलेल्या पूर्णचंद्रराव बुटी सभागृहातील प्रदर्शनात विदर्भातील गडचिरोलीपासून तर अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ येथील कानाकोपऱ्यातील दिव्यांग बांधवांनी दिवाळीच्या पर्वावर तयार केलेल्या विविध वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आपण फाउंडेशनच्या समन्वयक अमृता अदावडे यांनी दिली.

कुठलेही अनुदान न स्वीकारता दिव्यांग बांधवांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री येथे होणार आहे. दिव्यांग बांधवांनी केलेल्या परिश्रमाची किंमत येथे व्हावी. याशिवाय दिव्यांगांनी स्वतःला कमी लेखू नये यासाठी त्यांच्यासोबत सामान्यांचेही स्टॉल लावण्यात येत आहे. दिवाळीत लागणाऱ्या वस्तू खरेदी करून  दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास वाढण्यास नागरिकांनी मदत करावी. 
- अभिजित राऊत, समन्वयक, जिल्हा अपंग व पुनर्वसन केंद्र, नागपूर.

इको फ्रेंडली दिवाळी 
यावर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. नागपूरकरांनी याला  भरभरून दाद दिली. आता यंदाची दिवाळी इको फ्रेंडली साजरी करताना दिव्यांग बांधवांनी  दिवाळीत दिवे जाळू नये असे आवाहन करीत दिवे जाळण्यातून वाया जाणाऱ्या खाद्य तेलाला पर्याय म्हणून खास मेणबत्यांना आकार दिला आहे. तसेच पेपरच्या रद्दी कागदापासून तयार केलेल्या मूर्तीदेखील नागपूरकरांसाठी उपलब्ध होतील, असे निकेश पिने म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com