'राष्ट्रवादी' नसेल तरच काँग्रेससोबत : प्रकाश आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मूळात भाजप संघाला आरक्षण द्यायचे नसल्याने सरकार चर्चेचे केवळ सोंग करीत आहे. 

- प्रकाश आंबेडकर, भारिप-बहुजन महासंघाचे नेते

अमरावती : भारिप-बहुजन महासंघ काँग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीत नको आहे. ही अट मान्य असेल तरच काँग्रेससोबत आघाडी होईल, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. 

भारतीय राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले, की 2019 मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येता कामा नये, यासाठी कॉंग्रेसला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, काँग्रेसने उमेदवार निवडताना सर्व समाजघटकांना प्राधान्य दिले पाहिजे; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आम्हाला नको. या अटी मान्य असतील तरच आम्ही त्यांच्यासोबत राहू; अन्यथा राज्यातील संपूर्ण 48 लोकसभेच्या जागा मित्रपक्षांच्या मदतीने लढविण्यावर आम्ही ठाम आहोत. 
भाजप-शिवसेना युतीला मराठ्यांना आरक्षणच द्यायचेच नाही, त्यामुळे राज्यात हिंसाचार होऊनसुद्धा सरकार केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, मुळात मराठा आरक्षणाचा विषय तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने भिजत ठेवला होता. त्याचवेळी या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते; मात्र तत्कालीन सरकारने हे काम केले नाही. आता राज्यात आरक्षणासाठी हिंसाचार उफाळला आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Do alliance when NCP not with Congress says Prakash Ambedkar