करा इम्यूनिटी टाईट आणि जिंका कोरोनाशी फाईट 

अनुप ताले
Thursday, 16 April 2020

आजारांना रोखण्याचे शस्त्र आपल्याच शरीरात असून, ‘रोगप्रतिकारशक्ती’च्या सुरुपात ते काम करीत असते. फक्त ही रोगप्रतिकारशक्ती टिकवणे आणि वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि होमिओपॅथीचा अवलंब आवश्यक असल्याचे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संदीप चव्हाण यांनी सांगितले.

अकोला : ‘कोरोना’ विषाणूसोबत लढा देत असताना, कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्व जग प्रयत्नशिल आहे. त्यासाठी लस शोधन्याचेही शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, कोरोनाच नव्हे तर, इतरही आजारांना रोखण्याचे शस्त्र आपल्याच शरीरात असून, ‘रोगप्रतिकारशक्ती’च्या सुरुपात ते काम करीत असते. फक्त ही रोगप्रतिकारशक्ती टिकवणे आणि वाढविणे गरजेचे असून,  त्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि होमिओपॅथीचा अवलंब आवश्यक असल्याचे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. संदीप चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

संपूर्ण जगावर सध्या कोरोनाच्या स्वरुपात महा संकटाची स्थिती ओढवली आहे. अशा वेळी भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगली असून, आपल्या सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे तसेच भारतीयांच्या रोगप्रतिकारशक्तीमुळे ते शक्य झाले आहे. त्यामुळे यापुढेही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला असून, त्यासाठी होमिओपॅथी व आयुर्वेदाचा अवलंब करण्याचे सूचित केले आहे. मात्र कोणताही औषधोपचार घेण्यापूर्वी आपल्या दिनचर्येला व त्यामध्ये व्यायाम, खानपान, आहार-विहार, निद्रा, सकारात्मक दृष्टीकोन, वाचन यांना प्राधान्य देणे आवश्यक असून, यातूनच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासाठी होमिओपॅथी अतिशय महत्त्वाचा भाग असून, सहज व स्वस्त स्वरुपात ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. प्रत्येकाने त्यांच्या परिचीत किंवा नजिकच्या होमिओपॅथी तज्ज्ञांना भेटून होमिओपॅथीचा अवलंब करावा व रोगप्रतिकारशक्ती वाढवून आरोग्यविषयक समस्यांना समर्थपणे तोंड देण्याचे आवाहन, डॉ. संदीप चव्हाण यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र शासनानेही द्यावे प्राधान्य
‘कोरोना’शी लढताना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर देण्याचा सल्ला देशपातळीवर देण्यात आला असून, त्याअनुषंगांनेच सध्या केरळमध्ये पंचायत स्तरावर होमिओपॅथीचे डोज पॅकिंग करून घराघरात पोहचविल्या जात आहेत. गोवा व गुजरात सरकारनेही होमिओपॅथी वापराबाबत आवाहन केले असून, तो निर्णय वैयक्तीक ठेवला आहे. आयुष मंत्रालयाने सुद्धा होमिओपॅथी व आयुर्वेदाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनानेही राज्यात कोरोनासोबत लढताना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीला प्राधान्य देणे व आग्रही राहाणे अपेक्षित आहे.

 

Image may contain: 1 person, closeup

विश्वासाने करा होमिओपॅथीचा अवलंब
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम व आहाराला सर्वाधिक महत्त्व आहे. परंतु, सध्या संसर्गाची शक्यता लक्षात घेता, घरी उपलब्ध सुविधांचाच वापर करण्यावर प्रत्येकाने भर द्यावा व आहारात घरी उपलब्ध अन्न-धान्याचा उपयोग करावा. महत्त्वाचे म्हणजे श्वसनक्रिया बिघडणार नाही, अशा शीत, आंबट, तेलगट, शिळ्या पदार्थांचे सेवन टाळावे आणि होमिओपॅथीचा विश्वासाने अवलंब करावा.
- डॉ. संदीप चव्हाण, होमिओपॅथी तज्ज्ञ, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do Immunity strong and Win the Corona Fight