राजकीय स्वार्थासाठी एकतेला धोका नको - सरसंघचालक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

नागपूर - राजकीय तसेच पक्षीय स्वार्थासाठी देशाची एकता धोक्‍यात आणू नका, या शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सर्जिकल स्ट्राइकसंदर्भात विविध राजकीय पक्षांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर निशाणा साधला. सर्जिकल स्ट्राइककरिता सैन्याचे व मोदी सरकारचे कौतुक करताना सीमेवरील सुरक्षेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

नागपूर - राजकीय तसेच पक्षीय स्वार्थासाठी देशाची एकता धोक्‍यात आणू नका, या शब्दांत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सर्जिकल स्ट्राइकसंदर्भात विविध राजकीय पक्षांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर निशाणा साधला. सर्जिकल स्ट्राइककरिता सैन्याचे व मोदी सरकारचे कौतुक करताना सीमेवरील सुरक्षेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव तसेच नव्वदावा वर्धापनदिन रेशीमबाग मैदानावर झाला. स्वयंसेवकांचे पथसंचलन, कवायती व शस्त्रपूजनाने उत्सवाचा प्रारंभ झाला. अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय यंदा प्रमुख पाहुणे होते. डॉ. भागवत यांनी सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे कौतुक केले. ‘आपल्या नेत्यांचा संकल्प पक्का आहे, हे अलीकडेच झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने सिद्ध केले. पण, भविष्यातदेखील वक्तव्याची दृढता कृतीमध्ये आणावी लागेल. सीमेवरील उपद्रवांना थांबविण्यासाठी केंद्र व राज्यात एकवाक्‍यता आणावी लागेल,’ असे सांगतानाच पाकव्याप्त काश्‍मीर भारताचाच भाग आहे, याची जाण ठेवावी लागेल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे अनेक वर्षांमध्ये यंदा प्रथमच सरसंघचालकांच्या भाषणात चीनचा उल्लेख नव्हता. 

काश्‍मीरचा विकास का होत नाही, असा प्रश्‍नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. ते म्हणाले, काश्‍मीरच्या विकासासाठी दिलेला पैसा कुठे जातो, हा प्रश्‍न उपस्थित होतो. विभाजनाच्या वेळी जम्मू-काश्‍मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी विस्थापितांना विश्‍वास दिला. पण, आजही त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, नोकरी नाही. त्यांना न्याय देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. काश्‍मीरमध्ये उपद्रवींना उकसविण्याचे काम पाकिस्तान करतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे सीमेवरील सुरक्षेसाठी समन्वय आणि साधनसंपन्नता आवश्‍यक आहे. उग्रवादी, फुटीरतावादी सीमा भागात सक्रिय असणे देशाच्या सुरक्षेसाठी चांगले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

शिक्षण व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. केवळ मांसभर पगार घेण्यासाठी नोकरी करणारा शिक्षक राहून चालणार नाही. तसेच समाजाभिमुख अभ्यासक्रम आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात डीजे आणि डेकोरेशनवर जोर देण्यापेक्षा उत्सवाची पवित्रता कायम राखण्याचेही त्यांनी आवाहन केले. क्षेत्र संघचालक जयंतीभाई बाडोसिया, महानगरसंघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे, प्रांत सहसंघचालक श्रीराम हरकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, भोजपुरी अभिनेता खासदार मनोज तिवारी, वेस्ट इंडिजहून आलेले स्वामी ब्रह्मदेव, कॅनडाहून आलेले डॉ. टोनी नडार, राजा लुईस यांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती.

गडकरी, मुख्यमंत्री नव्या गणवेशात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला गणवेश यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचे सरसंघचालकांनी भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले. यंदाच्या उत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील नवीन गणवेशात उपस्थित झाले. सोहळा बघण्यासाठी आलेल्यांमध्येदेखील या गणवेशाची उत्सुकता आणि चर्चा होती.
 
गोरक्षकांना उपद्रवी समजू नका
देशभरात गोरक्षेचे कार्य करणाऱ्या सेवकांची उपद्रवींसोबत तुलना करू नका, या शब्दांत सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. गोहत्याबंदी व गोसंवर्धनाचा उल्लेख संविधानात आहे. तसेच विज्ञानावर आधारित गायीचे गुणधर्म स्वीकारण्यात आले आहे. गोहत्याबंदीचा कायदा आजच्याच सरकारने नव्हे तर यापूर्वीच्या सरकारनेही अनेकवेळा आणला. काही राज्य सरकारांनीही तो अमलात आणला. कायद्याच्या चौकटीतच  गोरक्षा व्हायला हवी. पण, गोरक्षेच्या नावावर उपद्रव करणाऱ्यांना आणि स्वयंभू सेवकांना एकाच तराजूत तोलून चालणार नाही, असेही सरसंघचालक म्हणाले.
 
अतिवंचितांसाठी कार्य करण्याची गरज - राय
आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणात सफाई मजदूर हलाखीचे आयुष्य जगत आहेत. घाण  साफ करताना त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. कित्येकांना तरुणपणीच मृत्यू येतोय. या वर्गासाठी कोणत्याच सरकारने योजना आणली नाही. विशेषतः काँग्रेसने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. त्यांना आजपर्यंत कुठल्याही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. देशातील या अतिवंचित वर्गासाठी कार्य करण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय यांनी व्यक्त केले.

Web Title: Do not risk the unity of political selfishness

टॅग्स