फुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

फुलपाखरांच्या प्रजाती "ब्ल्युमॉरमॉन'ला "नीलवंत' हे मराठी नाव देऊन नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारांनी हे शक्‍य झाले. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

नागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची नावे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसतील. निसर्गाने हजारो प्रकारच्या फुलपाखरांची निर्मिती केली आहे. फुलपाखरांच्या विशेषतांच्या आधारावर त्यांची इंग्रजीमध्ये नावे ठेवण्या आली आहेत. त्यापैकी काही नावांचे मराठीकरण करण्यात आले आहे. 

जैवविविधता मंडळाचा देशातील पहिलाच प्रयोग 
देशात दिसणाऱ्या एक हजार 500 आणि महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या 279 फुलपाखरांची नावे इंग्रजीत केलेली आहेत. ही नावे आता मराठीत करण्याचा निर्णय बर्डेकर यांनी घेतला. त्यानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलपाखरांच्या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले. यातूनच "त्रिमंडळ', 'तरंग', "मनमौजी', "यामिनी', "रुईकर', "रत्नमाला', 'तलवार', 'पुच्छ', 'गडद सरदार', "भटक्‍या', "मयूरेश', 'नायक' यासारखी आकर्षक मराठी नावे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजातींना देण्यात आली. 

 

Image may contain: plant, flower, outdoor and nature

राज्य फुलपाखरांच्या प्रजाती "ब्ल्युमॉरमॉन'ला "नीलवंत' हे मराठी नाव देऊन नामकरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारांनी हे शक्‍य झाले. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. 

हेही वाचा - video : कसं शक्‍य आहे? कोंबडीबिना उबविता येणार अंडी... वाचा

राज्यातील 279 फुलपाखरांचे नामकरण 
मराठी नावांमध्ये फुलपाखरांचे रूप दडलेले आहे. असे वाटले पाहिजे, या सगळ्या बाबींचा त्यात विचार करण्यात आला. मग पाच प्रकारांत फुलपाखरांची नावे मराठीत आणली आहेत. यात फुलपाखराचा रंग, रूप, पंख याचा विचार झाला. त्यातून "त्रिमंडल', 'तरंग' सारखी नावे पुढे आली. नामकरण करण्यासाठी फुलपाखरांच्या सवयी, त्यांचे पंख उघडण्याची, मिटण्याची लकब, बसण्याची पद्धत याचा विचार करण्यात आला. त्यातून 'मनमौजी' सारखे नाव ठेवले गेले.

फुलपाखरांना मराठी नाव देण्यासाठी ज्या वनस्पतींचा त्यांना खाद्य म्हणून उपयोग होतो, त्यातून 'यामिनी',"रुईकर' ही नावे पुढे आली. गवतावर बसणाऱ्या फुलपाखराचे नाव 'तृणासूर' करण्यात आले. फुलपाखरांच्या अधिवासाचाही यात विचार करून त्यातून "रत्नमाला' हे नाव ठेवण्यात आले. 

फुलांची नवी नावे अशी... 
"नीलवंती', "तलवार', 'पुच्छख', 'गडद सरदार', 'भटक्‍या', 'मयूरेश', 'नायक' यासारखी नावे फुलपाखरांच्या दिसण्यावरून ठेवण्यात आली. यामफ्लाय फुलपाखरांची खाद्य वनस्पती आहे म्हणून त्याचे नाव 'यामिनी' ठेवण्यात आले. 'ग्रास डेमन' या फुलपाखराचे नाव 'तृणासूर' असे भाषांतरित झाले. ब्ल्यूओकलिफ नावाच्या फुलपाखराचे 'नीलपर्ण' नावाने बारसे झाले.

व्हिडिओ पाहा - अरे... कुठे नेऊन ठेवला कांदा माझा?

कुळही मराठीत 
जैवविविधता बोर्डाच्या मंडळीनी फक्त फुलपाखराचेच मराठीत नामकरण केले, असे नाही तर त्यांनी त्यांचे कुळ ही मराठीत आणले. म्हणजेच निम्फालिडी या फुलपाखरू कुळाचे नाव 'कुंचलपाद' असे झाले. हेस्पिरिडीचे 'चपळ' कुळ झाले तर लायसनेडीचे 'नीळकुळ' झाले. अशाच पद्धतीने 'पुच्छ', 'मुग्धपंखी', 'कुळ' अस्तित्त्वात आले आहे. राज्यातील फुलपाखरे आणि त्यांची मराठी नावे याची माहिती देणारे पुस्तक छायाचित्रांसह वन विभागाने प्रकाशित केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do you know the names of butterflies?