किरकोळ शस्त्रक्रियांना ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

नागपूर - निवासी डॉक्‍टरांच्या सामूहिक रजा आंदोलनानंतर शासनाने निलंबनाचे हत्यार उपसले. मेडिकल-मेयोतील 440 डॉक्‍टरांना निलंबनाचे इंजेक्‍शन दिल्यानंतरही परिणाम झाला नाही. तर उपचारासाठी येणाऱ्या जनतेचे आरोग्यच धोक्‍यात आले असून, भरतींना सुटी देण्याचा सपाटा सुरू आहे. गुरुवारी 23 मार्च रोजी एकही किरकोळ शस्त्रक्रिया झाली नाही. गंभीर स्वरूपाच्या 9 शस्त्रक्रिया मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्‍टरांनी केल्यात. 

डॉक्‍टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर गेले. मेडिकल प्रशासनातर्फे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा पाढा वाचण्यात आला. 2,339 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात आले खरे. परंतु त्यापैकी केवळ 135 रुग्णांना भरती केले आहेत. एक हजार 554 रक्त तपासणी, 84 एक्‍स रे, 44 सीटी स्कॅन, 18 एमआरआय करण्यात आल्याची माहिती अधिष्ठात्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्‍स-रे तंत्रज्ञांनी केलीत. एक्‍स रे, रक्त तपासणी, सीटी स्कॅन, एमआरआय काढण्याचे काम तंत्रज्ञ करतात. मेयोच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे या खासगी कामानिमित्त विदेश दौऱ्यावर जात आहेत. अधिष्ठाता पदाचा प्रभार न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे राहील. 

300 इंटन्‌र्स आंदोलनात उतरले 
मारहाण सहन करत राहा, अशी शासनाची डॉक्‍टरांप्रति भूमिका आहे. यावेळी आंदोलन काळात निवासी डॉक्‍टरांना गृहीत धरले गेले. यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले, अशी टीका करीत मेडिकलमधील 200 आणि मेयोतील 100 असे एकूण 300 इंटनर्स्‌ संपामध्ये सामील झाले आहेत. 

सरकारी डॉक्‍टरांचा आज मोर्चा 
डॉक्‍टरांवर होणाऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या मेडिकल शाखेतर्फे 370 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक शुक्रवारी सकाळी 11 वाजता मेडिकल आवारात मोर्चा काढणार आहेत. यापूर्वी एपीआय सभागृहात सभा घेणार आहेत. शासनाने डॉक्‍टरांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ते पाऊल न उचलल्यास प्रत्यक्ष आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार आणि सचिव डॉ. अमित दिसावाल यांनी दिला आहे. मेयोत 35 वरिष्ठ निवासी डॉक्‍टर आंदोलनात उतरले. सोबतच प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांनी निवासी डॉक्‍टरांना पाठिंबा जाहीर केला.

Web Title: Doctor beat case