डॉक्‍टरला 90 हजारांनी लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

अमरावती : दोन वॉटर सॉफ्टनर बुक करून त्यासाठी दोन टप्प्यात ऑनलाइन पाठविलेली रक्कम परस्पर विड्रॉल करून अमरावतीच्या एका डॉक्‍टरची नव्वद हजार रुपयांनी फसवणूक केली.

अमरावती : दोन वॉटर सॉफ्टनर बुक करून त्यासाठी दोन टप्प्यात ऑनलाइन पाठविलेली रक्कम परस्पर विड्रॉल करून अमरावतीच्या एका डॉक्‍टरची नव्वद हजार रुपयांनी फसवणूक केली.
डॉ. ओमप्रकाश गोपालदास मुंधडा (रा. खापर्डे बगीचा) असे फसवणूक झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका मैदानात लागलेल्या कृषी प्रदर्शनात डॉ. मुंधडा यांनी वॉटर सोल्युशन कंपनीच्या स्टॉलला भेट दिली. तेथील व्हिजीट बुकवर स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक डॉक्‍टरांनी लिहिला होता. त्यानुसार काही दिवसांनी फोन करून डॉक्‍टरांनी दोन वॉटर सॉफ्टनर विकत घेण्यासाठी ऑर्डर बुक केली. ज्या व्यक्तीने डॉक्‍टरसोबत संवाद साधला त्याने पैसे पाठविण्याठी एक खातेक्रमांक दिला. त्यानुसार 24 जून 2019 रोजी पहिल्या टप्प्यात डॉ. मुंधडा यांनी ऑनलाइन 73 हजार 278 रुपये पाठविले. त्यानंतर तीन दिवसांनी 27 जून रोजी दुसऱ्यांदा 17 हजार अशी 90 हजार 278 रुपये दिलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या, गंगापूर रोड, नाशिक शाखेच्या खात्यावर पाठविले. संबंधितांनी खात्यातून ही रक्कमसुद्धा विड्रॉल केली. परंतु वॉटर सॉफ्टनर डॉक्‍टरांना न पाठविता त्यांची फसवणूक केली. डॉ. मुधडा यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी तोतयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
कंपनीच अस्तित्वात नाही
कंपनीकडे ऑनलाइन पैसे पाठवूनही वॉटर सॉफ्टनर न मिळाल्याने डॉक्‍टरांनी नाशिक येथील कंपनीच्या अस्तित्वाविषयी माहिती घेतली असता, अशा प्रकारची कंपनीच त्या पत्त्यावर उपलब्ध नसल्याचे डॉ. मुंधडा यांनी तक्रारीत म्हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The doctor looted 90 thousand rupees