मामू, डॉक्‍टरलोग भोत कम हैं रे!

file photo
file photo

नागपूर : भारतात 6 लाख प्रशिक्षित डॉक्‍टरांची तर 2 दशलक्ष नर्सची कमतरता आहे. ही माहिती अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. आरोग्यासंबंधीची ही अनास्था लक्षात घेता "अपुन को भी अच्छी ट्रिटमेंट लेना मंगता मामू, पर डॉक्‍टर और सिस्टर लोग भोत कम हैं रे' असे कुणी म्हटले तर नवल वाटायला नको.
देशात 10 लाख 41 हजार 395 नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्‍टिश्‍नर आहेत. महाराष्टात 1 लाख 53 हजार 513 जणांची नोंद असून तमिळनाडू आणि कर्नाटकातही एक लाखांपेक्षा अधिक नोंदणीकृत डॉक्‍टरांची संख्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार एक हजार लोकांमागे किमान एक डॉक्‍टर गरजेचा
आहे. परंतु, देशाची लोकसंख्या विचारात घेता रुग्णांची संख्या जास्त असून, त्या तुलनेत प्रशिक्षित डॉक्‍टरांचे प्रमाण अतिशय कमी आहे. डिसेंबर 2017 मध्ये ही माहिती राज्यसभेत देण्यात आली होती. डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील ही तफावत दूर करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने सरकार आणि सामाजिक पातळीवरही प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
अहवालातील ठळक बाबी
- भारतात 10 हजार रुग्णांमागे एक सरकारी डॉक्‍टर
- भारतात आरोग्यावरील 65 टक्के खर्च लोकांना स्वत:च्या खिशातून करावा लागतो
- दरवर्षी या खर्चामुळे 57 दशलक्ष लोक गरिबीच्या दरीत ढकलले जातात
- औषधांअभावी जगभरात दरवर्षी 5 कोटी 7 लाख लोकांचा मृत्यू
- भारतात दर 483 व्यक्तींमागे एक नर्सची आवश्‍यकता
उपाययोजना
भारताच्या आरोग्यव्यवस्थेत डॉक्‍टरांसह वैद्यकीय शिक्षणाच्या जागा खूप कमी आहेत. त्या वाढविण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली पाहिजे. वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तरच मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ डॉक्‍टर तयार होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com