भयंकर बाब, ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतात वापरलेले "हातमोजे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • नागपूरच्या मेडिकलमधील वास्तव 
  • डॉक्‍टरांची शोकांतिका 
  • विदारक वास्तव 
  • हातमोज्यांचा तुटवडा 

नागपूर : मेडिकलची कीर्ती जगभरात पोहोचली आहे. एकेकाळी येथे सर्व औषधे मोफत मिळायची. परंतु, आता रक्तदाबावर आवश्‍यक गोळीही मोफत मिळत नाही. रुग्णांना थेट प्रिस्क्रिप्शन दिले जाते. मात्र, यापलीकडे शल्यक्रियेदरम्यान एकदा वापरलेले हातमोजे डॉक्‍टर सहसा दुसऱ्यांदा वापरत नाही. मात्र, मेडिकलमध्ये हातमोजे धुऊन वापरण्याची वेळ डॉक्‍टरांवर आली आहे. विशेषतः येथील ऑपरेशन थिएटरमध्ये हातमोज्यांचा तुटवडा असून, काही प्रसंगी रुग्णांच्या नातेवाइकांकडूनही मागविले जातात. 

चुकीच्या निर्णयामुळेच डॉक्‍टरांवर आली वेळ 
मेडिकलमध्ये औषधांचा तसेच सर्जिकल साहित्याचा साठा ठेवण्यासाठी 9 कोटींचे औषधालय बांधण्यात आले. दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील खरेदीची प्रक्रिया हाफकिनमार्फत राबविण्याचा निणर्य घेतला आणि औषधांसह सर्जिकल साहित्याचा तुटवडा निर्माण झाला. या चुकीच्या निर्णयामुळेच मेडिकलमधील डॉक्‍टरांवर ही वेळ आल्याची चर्चा आहे. विशेषतः ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांना संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी नवीन हातमोजे डॉक्‍टर घालतात. परंतु, हातमोज्यांचा तुटवडा असल्याने परिचर हातमोजे धुऊन ठेवतात. हेच हातमोजे पुन्हा घालून शस्त्रक्रिया केली जाते.  

Image may contain: sky and outdoor

"हाफकिन'कडून हातमोज्यांचा पुरवठाच नाही 
मेडिकलमध्ये दररोज शंभरपेक्षा अधिक शस्त्रक्रिया होतात. याशिवाय स्त्री व प्रसूतिरोग विभागात गर्भवती महिलांची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात हातमोज्यांची गरज असते. याशिवाय आकस्मिक विभाग, अस्थिरोग, सर्जरी विभाग, प्लॅस्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रियागृहात शल्यक्रियेदरम्यान, रुग्णांच्या जखमा पुसण्यापासून तर ड्रेसिंग करण्यासाठी डॉक्‍टर, परिचारिकांनाही हातमोज्यांची गरज भासते. परंतु, हाफकिनकडून अद्याप मेडिकलला सुरळीत हातमोज्यांचा पुरवठा होत नसल्याची बाब उघडकीस आली. शल्यक्रिया विभागासह काही डॉक्‍टरांशी संपर्क साधला असता, हातमोज्यांचा तुटवडा असल्याचे नाव न टाकण्याच्या अटीवर कबूल केले. मात्र, एकदा वापरलेले हातमोजे पुन्हा वापरत नसल्याचा दावा प्रशासनाने केला. 

संसर्ग झाल्यास जबाबदार कोण? 
मेडिकलमधील हातमोज्यांचा साठा संपला आहे. रबराचे हातमोजे महाग असल्याने डॉक्‍टर स्वतःच्या पैशातून ते विकत घेऊन रुग्णांसाठी वापरू शकत नाही. त्यामुळे येथील अनेक निवासी डॉक्‍टरांकडून हातमोजे धुऊन पुन्हा वापरले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियेदरम्यान हातमोजे पुन्हा धुऊन वापरताना एखाद्या रुग्णाला संसर्ग झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्‍न उभा राहतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor reuse medical gloves at nagpur medical hospital