विद्यापीठाच्या आरोग्यकेंद्रात डॉक्‍टर सापडेना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ चौकातील आरोग्यकेंद्रात दीड महिन्यापासून डॉक्‍टर नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने एकीकडे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेश थांबले आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही मोठा फटका बसतो आहे.

विद्यापीठाचे आरोग्यकेंद्र नेहमीच विविध कारणांमुळे प्रकाशझोतात असते. केंद्रात महागडी उपकरणे आणून ठेवली असताना त्याचा उपयोग होत नसल्याची बाब मार्च महिन्यात झालेल्या सिनेट सभेमध्ये सदस्यांनी मांडली होती. तसेच आरोग्यकेंद्राच्या प्रश्‍नाला धरून कुलगुरूंना चांगलेच घेरले होते. ऍड. मनमोहन वाजपेयी यांनी या केंद्रात तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्याची बाब उघडकीस आणली होती. यावर कुलगुरूंनी विशेष समिती नेमून आरोग्यकेंद्रातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, यातील एकही प्रश्‍न सुटला नसल्याचे चित्र दिसून येते. केंद्रात असलेले डॉक्‍टर दीड महिन्यापासून वारांगल येथे नोकरी सोडून गेल्याचे समजते. त्यामुळे आता आरोग्यकेंद्र अटेंडंटच्या भरोशावर चालत आहे. मात्र, विद्यापीठाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नाही.
सध्या पावसाचे दिवस असल्याने साथीचे रोगांचे थैमान आहे. अशा दिवसांमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्‍यक असताना डॉक्‍टर नसल्याने तेही मिळणे कठीण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि प्रवेशाचा प्रश्‍न असताना त्यावर निर्णय घेण्यास विद्यापीठ उशीर करीत असल्याने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctor Sapedena at the University Health Center