‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला ठरू शकतो जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

दरवर्षी ९० लाख रुग्णांची नोंद
राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत पाचशे वरिष्ठ डॉक्‍टर (प्राध्यापक) आहेत. १,२५० सहयोगी प्राध्यापक तर एक हजार आठशे सहाय्यक प्राध्यापक आहेत. राज्यातील १६ वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णांमध्ये दरवर्षी ९० लाख रुग्णांची नोंद होते. तथापि, उन्हाळी सुट्यांच्या दोन महिन्यांच्या काळात तीन लाख रुग्णांना तपासण्याचे काम पन्नास टक्के डॉक्‍टर करतात.

नागपूर - टर्शरी केअर हॉस्पिटल म्हणून खेड्यातील आरोग्य केंद्रापासून तर जिल्हा रुग्णालयातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रेफर करण्याचे धोरण असते. बाह्यरुग्ण विभागांपासून सर्व वॉर्ड हाउसफुल्ल असताना नागपूरच्या मेडिकल-मेयोसह राज्यातील १६ मेडिकल कॉलेजमधील दोन हजार डॉक्‍टर महिनाभर ‘गुल’ आहे. उन्हाळी रजेचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो, अशी चर्चा आहे.

राज्यातील १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे चार हजार वैद्यकीय शिक्षक आहेत. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षकांसाठी (डॉक्‍टर) उन्हाळी सुट्यांमध्ये ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला वापरला जातो. यावर्षी १७ एप्रिल ते सात मे व आठ मे ते २९ जून असा सुट्यांचा कालावधी जाहीर केला आहे. मेडिकलमध्ये दर दिवसाला तीन ते साडेतीन हजार तर मेयोत दोन ते अडीच हजार रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. परंतु, रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्‍टरच उपस्थित नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

दुसरीकडे उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी डॉक्‍टरांना सुट्या देण्यात आल्या. रुग्णसेवेचे नियोजन कसे केले जाते यावर; मात्र साऱ्यांनी चुप्पी साधली आहे. उन्हाळी सुट्यांचा हा प्रघात ६० वर्षांपासून कायम असला तरी, कधी कधी उन्हाळी रजेचा ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला रुग्णांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो, याकडे शासन-प्रशासनाने लक्ष द्यावे. 

धोकादायक
राज्यातील आदिवासी पाडे, तांडे, पारध्यांच्या वस्त्यांपासून तर नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम अशा डोंगराळ मेळघाटातील रुग्ण मेडिकल, मेयोत रेफर केले जातात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयात अत्याधुनिक सोयी-सुविधा नसल्यामुळे टर्शरी केअरची मान्यता असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केले जाते. यामुळेच सुट्यांचा फॉर्म्युला हा जीवघेणा ठरतो, असे खासगीत खुद्द डॉक्‍टर सांगतात.

Web Title: Doctor Summer Holiday Fifty Fifty Formula Health Center