अरे हे चाललंय काय? कोरोनाच्या भीतीचा डॉक्‍टरांकडून धंदा! एकच चाचणी, तीन डॉक्‍टर, वेगवेगळे दर

प्रमोद काकडे | Tuesday, 15 September 2020

कोरोनाच्या आधी आणि आताच्या सीटी स्कॅनच्या दरात तब्बल तीनपटीने वाढ केली आहे. शहरात तीन डॉक्‍टरांकडे सीटी स्कॅनची व्यवस्था आहे. एकाच चाचणीसाठी तिघांचेही दर वेगवेगळे आहेत.

चंद्रपूर: कोरोनाच्या वादळात सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. रुग्णांना डॉक्‍टर मिळत नाही. रोज मृतांचा आकडा वाढत आहे. या संकटकाळात मात्र काही डॉक्‍टरांच्या "धंद्या'ला चांगलीच पालवी फुटली आहे. छातीच्या सीटी स्कॅनसाठी (एचआरसीटी) रुग्णांकडून अवाच्यासव्वा शुल्क आकारले जात आहे. 

कोरोनाच्या आधी आणि आताच्या सीटी स्कॅनच्या दरात तब्बल तीनपटीने वाढ केली आहे. शहरात तीन डॉक्‍टरांकडे सीटी स्कॅनची व्यवस्था आहे. एकाच चाचणीसाठी तिघांचेही दर वेगवेगळे आहेत.

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

जिल्ह्यात डॉ. रवी अल्लुरवार, डॉ. अनिल माडुरवार आणि डॉ. अजय मेहरा यांच्याकडे सीटीस्कॅनची व्यवस्था आहे. या तिघांचेही खासगी रुग्णालये शहरात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू आहे. सहा हजारांवर रुग्णसंख्या गेली आहे. कोरोनाच्या संसर्गात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षण सुरवातीला आढळतात. त्यानंतर संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहोचतो. त्यामुळे अशा रुग्णांना सीटी स्कॅन( एचआरसीटी टेस्ट) करण्याचे डॉक्‍टर सुचवितात. सध्या या तिघांच्याही रुग्णालयात पाय ठेवायला जागा नाही.

कोरोना बाधित आणि संशयितांच्या रांगा लागल्या आहेत. यापार्श्‍वभूमीवर आता कोरोनाच्या संकटाला संधीत रूपांतरित करण्याचा गोरखधंदा या डॉक्‍टरांनी सुरू केला. कोरोनाबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. याच भीतीचा वापर रुग्णांकडून जादा शुल्क उकळण्यासाठी केला जात आहे.

डॉ. अनिल माडुरवार इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. डॉक्‍टरांवरील अन्याय आणि वैद्यकीय क्षेत्रातील चुकीच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. परंतु डॉ. माडुरवार यांनीच सीटीस्कॅनच्या दरात सहा हजार रुपयांपर्यंत वाढ केली. जटपुरागेट परिसरात डॉ. रवी अल्लूरवार यांचे हॉस्पिटल आहे. ते रुग्णांकडून चक्क आठ हजार रुपये सीटीस्कॅनचे घेत आहे. 

नागपूर मार्गावरील डॉ. अजय मेहरा रुग्णांकडून पाच हजार रुपये वसूल करीत आहे. एकाच चाचणीसाठी शहरात तिघेजण वेगवेगळे दर आकारत आहे. मात्र, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही कायदेशीर तरतूद नाही. डॉक्‍टरांनी एकत्र बसून दर ठरवावे. कुणी तक्रार केली तर कारवाई करू, असे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांनी सांगितले. यासंदर्भात डॉ. अल्लूरवार आणि डॉ. मेहरा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. डॉ. माडुरवार यांनी फक्त पाचशे रुपयांची वाढ केल्याचे सांगितले.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

कोरोनाच्या टाळूवरील लोणी

सीटी स्कॅन (एचआरसीटी) चाचणीसाठी देशभरातील कोणत्याही महानगरात अडीच ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रपूर मात्र अपवाद ठरले आहे. दरम्यान, आजच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयातील सीटी स्कॅनच्या दर निश्‍चितीसाठी समिती गठित करणार, असे सांगितले. 

समिती नेमकी कधी गठित होईल, हे जाहीर केले नाही. तोपर्यंत या डॉक्‍टरांकडून कोरोना रुग्णांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार सुरूच राहणार आहे. कोरोनात रुग्णांची संख्या वाढली. खर्च वाढला आहे. अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुरक्षेच्या साधनांचा वापर करावा लागतो. त्यामुुळे दर वाढले असेल या शब्दांत रेडीओलॉजिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. आर. एन. भलमे यांनी सांगून दरवाढीची पाठराखण केली.

एचआरसीटी टेस्टचे दर

डॉ. रवी अल्लुरवार- ८ हजार
डॉ. अनिल माडुरवार- ६ हजार
डॉ. अजय मेहरा- ५ हजार

संपादन - अथर्व महांकाळ