आज डॉक्‍टर संपावर आहेत, नंतर या!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

नागपूर : डॉक्‍टरांनी भरती होण्यासाठी बोलावले होते. परंतु आज डॉक्‍टरांचा संप आहे. तपासणी होणार नाही. नंतर या....हा संवाद आहे, मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागातील. संपाच्या पहिल्या दिवशीच बुधवारी मेडिकल, मेयो रुग्णालयांत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मार्डच्या संपामुळे रुग्णसेवेसाठी वरिष्ठ डॉक्‍टरांना मैदानात उतरल्याचे दिसून आले. मात्र मेडिकल आणि मेयोतील सुमारे 50 पेक्षा अधिक नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक कोलमडले. राज्यातील मार्डशी संलग्न असलेले चार हजार निवासी डॉक्‍टर संपावर होते. संपात सहभागी मेडिकलमधील 540 तर मेयोतील 200 निवासी डॉक्‍टरांनी बेमुदत स्टेथेस्कोप खाली ठेवला आहे.

नागपूर : डॉक्‍टरांनी भरती होण्यासाठी बोलावले होते. परंतु आज डॉक्‍टरांचा संप आहे. तपासणी होणार नाही. नंतर या....हा संवाद आहे, मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागातील. संपाच्या पहिल्या दिवशीच बुधवारी मेडिकल, मेयो रुग्णालयांत रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मार्डच्या संपामुळे रुग्णसेवेसाठी वरिष्ठ डॉक्‍टरांना मैदानात उतरल्याचे दिसून आले. मात्र मेडिकल आणि मेयोतील सुमारे 50 पेक्षा अधिक नियोजित शस्त्रक्रियांचे वेळापत्रक कोलमडले. राज्यातील मार्डशी संलग्न असलेले चार हजार निवासी डॉक्‍टर संपावर होते. संपात सहभागी मेडिकलमधील 540 तर मेयोतील 200 निवासी डॉक्‍टरांनी बेमुदत स्टेथेस्कोप खाली ठेवला आहे. देशात राष्ट्रीय वैद्यकीय कमिशन लागू करण्याचे संकेत दिसत आहेत. हे वैद्यकीय क्षेत्रासाठी घातक आहे. हे विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसह तीन वर्षांपूर्वी निवासी डॉक्‍टरांचे मानधन वाढवण्याचे आश्‍वासन विद्यमान वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी दिले होते, परंतु त्यांनी आश्‍वासनाकडे पाठ फिरवली. यामुळे सामूहिक रजा आंदोलन उभारावे लागले असल्याचे मेडिकलच्या मार्डचे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे म्हणाले.डॉक्‍टरांना रजा, महिला निवासी डॉक्‍टरांना प्रसूती रजा मंजूर करण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले आहे. याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. काही वरिष्ठ डॉक्‍टर्सच्या उपस्थितीने अधिक हाल होणे टळले. वरिष्ठ डॉक्‍टर अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करताना दिसत होते. या डॉक्‍टरांनी बाह्यरुग्ण विभागाच्या बरोबरीनेच शस्त्रक्रियादेखील केल्या. निवासी डॉक्‍टरांच्या बंदचा पहिला दिवस असल्याने फार अडचण आली नाही. परंतु निवासी डॉक्‍टरांचा संप सुरू असल्यास याचे गंभीर परिणाम रुग्णसेवेवर होतील, हे वरिष्ठ डॉक्‍टरांनी सांगितले.  बुधवारी सकाळी 8 वाजतापासून मेयो-मेडिकलमधील वॉर्ड, रक्त तपासणी केंद्र, अतिदक्षता विभाग, कॅज्युअल्टीतून सेवा बंद करत शासनाच्या विरोधात घोषणा देत सारे निवासी डॉक्‍टर एकत्र आले. अधिष्ठाता कार्यालयावर मोर्चा नेला. दोन्ही रुग्णालय प्रशासनाकडून संप मागे घेण्याची विनंती केली. हा प्रस्ताव फेटाळत आंदोलक निवासी डॉक्‍टरांनी रुग्णालय परिसरात भजन, गाण्यासह भिक्षा मागून उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेष असे की, निवासी डॉक्‍टरांनी मेडिकलमध्ये नेहमी जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदानाचा धर्म निभावला. सुमारे सत्तर निवासी डॉक्‍टरांनी रक्तदान केले. यात मेडिकल आणि मेयोतील डॉक्‍टरांचा समावेश होता. डॉ. शुभम इंगळे, मेयोच्या मार्डचे डॉ. प्रथमेश असवले, डॉ. खान, डॉ. अनुपमा हेगडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. मेडिकलमध्ये दर दिवसाला 70 मेजर शस्त्रक्रिया होतात, परंतु गुरुवारी संपामुळे केवळ 47 मेजर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर मेयोमध्ये दर दिवसाला 30 शस्त्रक्रिया होतात, पंरतु बुधवारी अवघ्या 10 शस्त्रक्रियांवर थांबावे लागले. मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात 2 हजार 926 तर मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात केवळ 1849 रुग्णांची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors are on strike today, come on later!