भामरागड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरच गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

भामरागड (जि. गडचिरोली) : सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र आजारांचे प्रमाण वाढले आहे. असे असताना येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे व डॉ. कांबळे दोघेही दोन दिवसांपासून गैरहजर आहेत. हा प्रकार गुरुवारी (ता. 29) पंचायत समिती सभापती सुकराम मडावी रुग्णालयात आले असता उघड झाला. त्यांनी तत्काळ तहसीलदार कैलास अंडील यांच्याशी संपर्क साधून त्यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे.

पंचायत समितीचे सभापती मडावी यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता एकही डॉक्‍टर येथे उपस्थित नसल्याचे लक्षात आले. या ग्रामीण रुग्णालयात बाहेरगावाहून उपचार करण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. परंतु, डॉक्‍टरच नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी डॉक्‍टर नसल्याची माहिती भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांना दिली. तहसीलदार अंडील यांनी समस्येची दखल घेत तत्काळ ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकही डॉक्‍टर नसल्याचे लक्षात येताच त्यांचाही पारा चढला. येथे सध्या डॉ. वानखेडे व डॉ. कांबळे कार्यरत आहेत. रुग्णालय अधीक्षकाची जबाबदारी डॉ. वानखेडे यांच्याकडे आहे. पण, दोघेही रुग्णालयातील कामाकडे लक्ष देत नाहीत. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून ते रुग्णालयात नाहीत. यासंदर्भात डॉ. वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगितले. पण, तहसीलदार अंडील यांना विचारणा केली असता त्यांचा कोणताच रजेचा अर्ज तिथे नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुविधा असूनही बेजबाबदारी
भामरागड हा अतिदुर्गम तालुका असल्याने येथील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह व तहसीलदार कैलास अंडील सतत प्रयत्नरत आहेत. येथे सर्वतोपरी सुविधा पुरविण्यात येत असतात. विजेअभावी समस्या निर्माण होऊ नये म्हणून जनरेटर देण्यात आले. प्रसूतीगृहाच्या खोलीला मंजुरी मिळाली, सौरऊर्जेवर रुग्णालय चालविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला, या रुग्णालयातील सुविधांसाठी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले. एकीकडे जिल्हा व तालुका प्रशासन रुग्णालयातील सुविधांसाठी झटत असताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मात्र बेजबाबदार वृत्तीचे दर्शन घडवत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors at Bhamragad Rural Hospital absent