कोंढाळी आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांची उसनवारी! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

कोंढाळी (जि.नागपूर)  नागपूर-अमरावती मार्गावरील अत्यंत संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पाच वर्षांपासून गट "अ' वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. 24 बाय 7 (आयपीएसएच) मानांकित असलेल्या या केंद्रात गट "ब'च्यासुद्धा अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही. फक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तेही एक, अशी स्थिती असताना 43 हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी कशी सांभाळावी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जुलै महिन्यात एक तर सप्टेंबर महिन्यात एक, अशा दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात एक नियमित तर एका बंधपात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पदभार सांभाळत सेवा दिली. मात्र या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची अडचण सांगत एक महिन्याआधीच जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याकडे राजीनामे सुपूर्द केले. सध्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केंद्रात येणे बंद केले आहे. खरे तर आता कोंढाळीच्या मूर्ती व मासोद या आरोग्यकेंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरमल यांच्या देखरेखीत उधारीवरील डॉक्‍टरांच्या साहाय्याने काम सुरू आहे. मात्र या आरोग्यकेंद्राला नियमित वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने हे प्रशासनाचे अपयश समजले जात आहे. 
आरोग्यमंत्र्यांच्या आकस्मिक भेटी 
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी 14 डिसेंबर 2017 ला व विद्यमान आरोग्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 18 जानेवारीला केंद्रात आकस्मिक भेटी दिल्या. याप्रसंगी स्थानिक सरपंच, उपसरपंचांनी कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची माहिती दिली. तेव्हा दोन्ही आजी व माजी आरोग्यमंत्र्यांनी येथील गट "अ'च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे भरण्याच्या उपस्थितांसमोर आरोग्य महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र आरोग्य महासंचालनालयाकडून मागील पाच वर्षांत कुठलीही दखल घेतली नाही. खरे तर दोन्ही आजी-माजी आरोग्यमंत्र्यांच्या आदेश व सूचनांना केराची टोपली दाखवली असल्याने मागील पाच वर्षांपासून आजही गट "अ' वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्तच आहेत. गट "ब' अधिकाऱ्यांचीही पदे भरण्यात येत नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors recruitment at Kondhli Health Center!