चिमुकलीच्या आतड्यातून काढली गिळलेली ‘पिन’ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

सुपर स्पेशालिटीतील गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विभागातील डॉक्‍टरांनी इंडोस्कोपीद्वारे अवघड प्रक्रिया करून गुरुवारी या चिमुकलीच्या आतड्यातून ही पीन काढली.

नागपूर - आठ वर्षीय चिमुकलीला पोटदुखी होती. एका डॉक्‍टरने एक्‍स रे काढण्याचा सल्ला दिला आणि निदानात लोखंडी सळी लहान आतड्यात रुतून बसल्याचे दिसून आले. पालकांनी खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तेथील डॉक्‍टरांनी भरती न केल्याने ‘सुपर’मध्ये आणले.

सुपर स्पेशालिटीतील गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विभागातील डॉक्‍टरांनी इंडोस्कोपीद्वारे अवघड प्रक्रिया करून गुरुवारी या चिमुकलीच्या आतड्यातून ही पीन काढली. मुलीचा जीव वाचल्याने आई-वडिलांसह नातेवाइकांनी डॉक्‍टरांचे आभार मानले.  पायल संजय घारणे असे पिन गिळणाऱ्या चिमुकलीचे नावआहे. ती चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती येथील रहिवासी आहे. तिचे वडील मजुरी करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च आवाक्‍याबाहेरचा होता. लेकीच्या जिवासाठी खासगीत उपचाराची तयारी दर्शविली. परंतु, कोणीही भरती घेतले नाही. अखेर वडील संजय आणि आई कुंदा यांनी मुलीला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आणले. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी पायलच्या पोटाचा एक्‍सरे काढला. पोटातील लहान आतड्यांमध्ये ‘पिन’ असल्याचे निदान झाले. गॅस्ट्रॉइंट्रॉलॉजी विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात डॉ. नितीन गायकवाड, डॉ. हरित कोठारी, डॉ. विनित गुप्ता, डॉ. साहिल परमार यांच्या वैद्यकीय पथकाने दुर्बिणीद्वारे इंडोस्कोपी करीत पायलच्या पोटातील पीन बाहेर काढली. 

मुले खेळताना पालकांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष असते. पालक स्वतः मोबाईलमध्ये गर्क असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होते. पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. जेणेकरून चिमुकल्यांवर नजर राहील आणि अशा घटना थांबवता येतील. चार महिन्यांपूर्वी पिन गिळली होती. ही पिन गंजली होती. संसर्ग होण्याची भीती होती. 
-डॉ. सुधीर गुप्ता, विभागप्रमुख, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी, नागपूर.

Web Title: Doctors removed the clip by making a difficult process through endoscopy

टॅग्स