भिक्षेकऱ्यांची सेवा करणारे डॉक्‍टर अमरावतीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

अमरावती ः "सकाळ' माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या "डोनेट युवर बुक' या उपक्रमासाठी पुणे येथील भिक्षेकऱ्यांची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनवणे अमरावतीत येत आहेत.

अमरावती ः "सकाळ' माध्यम समूह व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या "डोनेट युवर बुक' या उपक्रमासाठी पुणे येथील भिक्षेकऱ्यांची सेवा करणारे डॉ. अभिजित सोनवणे अमरावतीत येत आहेत.
शैक्षणिक साहित्याच्या अभावात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी "सकाळ'ने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. न्यू गोल्डन इंग्लिश स्कूलचे संचालक अनिल आसलकर यांचे या उपक्रमाला सातत्याने सहकार्य राहिले आहे. यंदा महापालिका आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे तसेच अन्य अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'ला या उपक्रमात साथ दिल्याने हा भव्य सोहळा होणार आहे. महापालिकेचे शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच विविध विभागांत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवकसुद्धा या उपक्रमात सहभागी होत आहेत. प्रत्येकाने त्यांच्या परीने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
येथे करा संपर्क
"डोनेट युवर बुक' या उपक्रमात सहभागी होण्यासाठी हर्षल श्रीखंडे 9881738896 किंवा हुकूम माने 9881122351 यांच्याशी संपर्क साधून आपण आपली मदत देऊ शकता.
कोण आहेत डॉ. सोनवणे?
डॉ. अभिजित सोनवणे हे मूळचे कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. शहराच्या विविध भागांत भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांना वैद्यकीय सेवा मिळणे कठीण असते, त्यामुळे 2015 पासून त्यांनी भिक्षा मागणाऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ते एका आंतरराष्ट्रीय संस्थेत कार्यरत होते. त्यावेळी त्यांचे उत्पन्न दरमहा तीन लाखांवर होते. परंतु भिक्षेकऱ्यांची अवस्था पाहून त्यांनी या लोकांसाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी डॉ. मनीषा यांनीसुद्धा त्यांना या कार्यात साथ दिली. भिक्षेकऱ्यांना शारीरिक, भावनिक, शैक्षणिक व आर्थिक सहकार्य करण्याची त्यांची मालिका सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors serving beggars in Amravati