श्‍वानांच्या तावडीतून सोडविले विद्यार्थ्याला

नंदनवन ः नासुप्र संकुलाजवळ श्‍वानांचा झुंड.
नंदनवन ः नासुप्र संकुलाजवळ श्‍वानांचा झुंड.

नागपूर : शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून, आज नंदनवन परिसरात एका विद्यार्थ्यावर हल्ला केला. परिसरातील उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांमुळे विद्यार्थी बचावला. मात्र, दहा ते बारा कुत्र्यांच्या झुंडशाहीच्या प्रकारामुळे शहरात दहशतीचे वातावरण असून, कथित श्‍वानप्रेमींमुळे महापालिकाही मूग गिळून बसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
नंदनवन परिसरातील नासुप्र संकुलाजवळून रस्ता असून, येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत जातात. या परिसरात अवधेशानंद विद्यालय, नंदनवन हायस्कूल, शिशू ज्ञान मंदिर, ईपी कॉन्व्हेंट, जनरल आवारी हायस्कूल आदी शाळा आहेत. या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांसाठी नासुप्र संकुलाजवळील एकमेव मार्ग आहे. मात्र, येथे कुत्र्यांनी हैदोस मांडला आहे. आज सकाळी एक विद्यार्थी शाळेत जात असताना बारा ते पंधरा कुत्र्यांच्या झुंडाने त्याला घेरले. त्यामुळे विद्यार्थी घाबरला. विद्यार्थ्यांच्या ओरडण्याच्या व कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने जवळच असलेल्या उद्यानात फिरायला येणारे नागरिक धावले. विद्यार्थ्याला घेरून हल्ला करण्याच्या तयारीतील कुत्र्यांचे झुंड नागरिकांना दिसले. काही नागरिकांनी दगड मारून कुत्र्यांना पळवून लावले. त्यामुळे या विद्यार्थ्याचा जीव वाचल्याचे परिसरातील योगेश बनसोड यांनी सांगितले. या घटनेने या परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण आहे. कथित श्‍वानप्रेमींमुळे महापालिकेने कुत्र्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कुत्र्यांची हिंमत वाढली असून, रस्त्यात कुणामागेही धावत सुटतात. त्यामुळे अपघाताचीही शक्‍यता बळावली आहे. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते योगेश बनसोड, जग्गू तितरमारे, तन्मय गायकी यांनी मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.  
दररोज बारा नागरिकांना चावा
गेल्या सात वर्षांत 31 हजार नागरिकांना श्‍वानांनी चावा घेतल्याची बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. अर्थात शहरात दररोज 12 नागरिकांना मोकाट श्‍वान चावा घेत आहेत. मोकाट श्‍वानांवर शस्त्रक्रियेसाठी महापालिकेकडून उपाययोजनांचे प्रस्तावच तयार नाही.
पुरुषच "टार्गेट'
सात वर्षांतील आकडेवारीनुसार मोकाट श्‍वानांनी पुरुषांनाच "टार्गेट' केल्याचे दिसून येत आहे. चावा घेतलेल्या 31 हजार जणांत 16 हजार 684 पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय सात हजार 544 चिमुकले तर सात हजार 30 महिलांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com