नवलच की...लालपाणी बघताच कुत्र्यांची शौच बंद?

नीलेश झाडे/सिद्धार्थ गोसावी
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

लाल रंगाचा कपडा दाखविला की ट्रेन थांबतेय. लाल कपडा बघून बैल सुसाट धावत सुटतोय. आता या लाल रंगाचा नवा प्रताप बघितला; तर या रंगाच्या तुम्ही नक्कीच प्रेमात पडालं. असं काय झालं? लाल रंगाचे पाणी बघितलं की मोकाट कुत्रे शौच विसरतात म्हणे.

धाबा/कोरपना (जि. चंद्रपूर) : ये लाल रंग कब मुझे छोडेगा.. असे एका चित्रपटातील गाणे प्रसिद्ध झाले आहे. लाल रंगात फार ताकद असते. लाल रंगाचे पाणी बघितले की कुत्रेही संडास करण्याचे विसरतात, असे कुण्या वन्यजीव अभ्यासकाने म्हटले नाही की एखाद्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही याचा शोध लावला नाही.

हा नवाच शोध चंद्रपूर आणि बल्हारपूरचा नागरिकांनी लावला आहे. अंगणात, घरासमोर कुत्रे संडास करू नये यासाठी घरासमोर बॉटलीत लालपाणी ठेवून ते निवांत झोपतात.

मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर

शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. मोकाट कुत्र्यांकडून चावा घेण्याचे प्रकार वाढले असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यात अनेक कुत्रे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे आता नवीनच समस्या उद्‌भवली आहे. अंगणात, दारात, रस्त्यावर मोकाट कुत्रे शौच करीत असल्याने सर्वत्र घाण पसरत आहे. या प्रकाराने शहरवासी त्रस्त झाले आहेत.

बॉटलमध्ये ओतले जाते लालपाणी

अशात मोकाट कुत्रे अंगणात शौच करू नये यासाठी नवीन आयडिया शहरवासींनी अंमलात आणली आहे. एका प्लास्टिकचा बॉटलमध्ये किंवा डब्यात पाणी ओतले जाते. त्या पाण्यात कुंकू टाकला जातो. कुंकू टाकलेले लाल पाणी दरवाज्याजवळ किंवा वॉल कंपाउंडजवळ ठेवले जाते. हे लाल पाणी बघून कुत्रे घराच्या जवळपास शौच करीत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. चंद्रपूर, बल्हारपूरचा अनेक भागात हा प्रकार सुरू आहे.

जाणून घ्या : दोन बिबट्यांसह पाच वन्यप्राण्यांची शिकार...चंद्रपूर हादरले

राजधानीचे लोण चंद्रपुरात

कुत्र्यांना घरापासून दूर शौच करण्यास भाग पाडणाऱ्या या लाल पाण्याचा प्रयोग नागपूर शहरात झाला होता. नागपूर, हिंगणघाट शहरातील लोण आता चंद्रपूर जिल्ह्यात येऊन धडकले आहे. त्यामुळे नागरिकांनी या लाल पाण्याचा प्रयोग केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dogs latrines closed after seeing red water?