स्मार्ट सिटीतील "आरटीओ'त कुत्री करतात स्वागत

rto
rto

नागपूर ः पूर्व नागपुरातील 1,730 एकरांत स्मार्ट सिटी प्रकल्प आकार घेत असतानाच याच भागातील चिखली येथे असलेल्या आरटीओ कार्यालयात लायसन्स, वाहन ट्रान्सफरसाठी येणाऱ्या नागरिकांचे स्वागत कुत्री करीत असल्याचे चित्र आहे. या कार्यालयात आल्यानंतर एखादा कोंडवाडा तरी बरा, असे शब्द नागरिकांच्या ओठातून बाहेर पडतात. एकूणच दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या या कार्यालयात सुविधांचा बोजवारा उडाला आहे.

पूर्व नागपुरात आरटीओ कार्यालयाला 2011 मध्ये शासनाची मंजुरी मिळाली. मात्र, तीन वर्षे जागेच्या शोधात कार्यालय सुरू होऊ शकले नाही. 2014 मध्ये चिखली, डिप्टी सिग्नल येथे नासुप्रच्या जागेवर कार्यालय सुरू झाले. मात्र, गेल्या पाच वर्षांत येथे कुठल्याही सुविधांत सुधारणा झाली नाही. नुकताच आलेल्या पावसाने कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य दिसून आले. वाहनांची ट्रायल घेण्यासाठी असलेल्या जागेवर चिखल बघताच अनेकजण नाक मुरडत परत जात असल्याचे मनोज खिसाग्रा या तरुणाने नमूद केले. संपूर्ण परिसरात साचलेले पाणी, चिखलामुळे ट्रायलसाठी कधी तरी येऊ, अशी भूमिका घेत तरुण, तरुणी परत जात असल्याने त्यांच्या वेळेचाही अपव्यय होत आहे. या कार्यालयाचा फेरफटका मारला असता पावसामुळे कुत्र्यांनी रस्त्याऐवजी या कार्यालयात ठाण मांडल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे कार्यालयात शिरताना कुत्रीच नागरिकांचे स्वागत करीत आहेत. कुत्र्यांच्या भीतीनेही नागरिक कार्यालयात जाण्यास टाळत आहे. येथे साधे पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. एकूणच या आरटीओ कार्यालयात सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. मध्य, दक्षिण, उत्तर नागपूरसह पूर्व नागपुरातील हजारो नागरिक, तरुण, तरुणी या कार्यालयात विविध कामासाठी येतात. परंतु, येथील असुविधांमुळे हीच काय स्मार्ट सिटी? असा टोला हाणत नागरिक परत जात असल्याचे प्रा. सचिन काळबांडे यांनी "सकाळ'सोबत बोलताना सांगितले. अक्षरशः कोंडवाड्यात आल्याचे जाणवते. अनेकदा अधिकारीही गायब असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहनांच्या ट्रायलसाठी मैदानाची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने पहिल्यांदाच ट्रायल देणाऱ्यांची तारांबळ उडते. परिणामी त्यांना पुन्हा-पुन्हा ट्रायलसाठी यावे लागत असल्याने वेळ व पैसा, दोन्हीचा अपव्यय होत असल्याचे भरतसिंग थापा यांनी सांगितले.
चौकशी अधिकारीही गायब
आरटीओ कार्यालयात नागरिकांना एकदाच काम पडते. अनेकांना कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी किंवा व्यवस्थेची माहिती नसते. अशावेळी नागरिक चौकशी अधिकाऱ्याकडे आशेने बघतो. परंतु, येथे चौकशी अधिकारीच गायब राहात असल्याने तासनतास नागरिकांना त्याची प्रतीक्षा करावी लागते. एवढेच नव्हे कार्यालयात दिशानिर्देश देणारे कुठलेही फलक नसल्यानेही नागरिकांची कोंडी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com