डॉन अरुण गवळीला निवडणुकीनंतर संचित रजा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

मुंबईचा डॉन अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २५ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. २८ एप्रिलला मुंबईतील निवडणूक झाल्यानंतर त्याला कारागृहातून सोडण्यात येणार आहे. त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

नागपूर - मुंबईचा डॉन अरुण गवळीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २५ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. २८ एप्रिलला मुंबईतील निवडणूक झाल्यानंतर त्याला कारागृहातून सोडण्यात येणार आहे. त्याला कारागृहाबाहेर सोडण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

गवळी शिवसेनेच्या एका नगरसेवकाच्या खून प्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. उपराजधानीत दाखल झाल्यापासून त्याने पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी, मुलाचे लग्न, आईचा मृत्यू अशाप्रसंगी वेळोवेळी कधी संचित रजा, तर कधी अभिवचन रजा घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याने कारागृह उपमहानिरीक्षकांकडे अर्ज करून संचित रजा मिळण्याची विनंती केली. त्याचा अर्ज उपमहानिरीक्षकांनी फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली.

सरकारने त्याला निवडणूक काळात सुटी दिल्यास व तो मुंबईत दाखल झाल्यास अनुचित घटना घडण्याची शक्‍यता वर्तवून विरोध केला होता. पण, गवळीने आपण यापूर्वीही अनेकदा रजा घेतली असून रजा संपताच कारागृहात हजर झालो आहे. त्या काळात आपल्याकडून कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

त्यामुळे आपल्याला रजा मंजूर करावी, अशी विनंती केली. सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्या. झका हक आणि न्या. विनय जोशी यांनी गवळीला २८ दिवसांची रजा मंजूर करून ३० एप्रिलनंतर सोडण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले. गवळीतर्फे ॲड. राजेंद्र डागा आणि ॲड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.

Web Title: Don arun gawli on Leave after election