कुख्यात गुंडाचा "गेम'

नागपूर ः घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांचे पथक.
नागपूर ः घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांचे पथक.

कुख्यात गुंडाचा "गेम'
नागपूर : जुगार, दारूविक्री यांसारख्या अवैध व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून चार आरोपींनी घातक शस्त्रांचे घाव घालून कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी दुपारी नाईक तलाव, राऊत चौक परिसरात घडलेल्या या घटनेने मध्य नागपुरातील गुन्हेगारी विश्‍वात खळबळ उडवून दिली. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत.
पिंटू ठवकर (30) रा. नाईक तलाव असे मृताचे तर सीताराम शाहू (30), सागर ऊर्फ भांजा तेलगे (18), मंगल मांढरे (20) अशी आरोपींची नावे असून त्यांच्या एका 16 वर्षीय साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले आहे. मृतआणि आरोपी एकाच वसाहतीतील असल्याने एकमेकांचे मित्रच होते. पण, अवैध व्यवसायातील संघर्षातून वादाची ठिणगी पडली. कुख्यात गुंड असलेल्या पिंटूविरोधात खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी वसुली, पोलिसांवर हल्ला, दंगा भडकावणे यांसारखे सुमारे दीड डझन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची नाईक तलाव परिसरात प्रचंड दहशत होती. वाद निर्माण झाल्यापासून पिंटू आपला घात करील, अशी भीती आरोपींना होती. यामुळे त्यांनी पिंटूचा गेम करण्याचा निर्णय घेतला. मागील 10 दिवसांपासून आरोपी त्याच्या मागावर होते.
शुक्रवारी पिंटूची न्यायालयात तारीख होती. दुपारी पावणे तीनच्या सुमारास कोर्टातून तारीख घेऊन पिंटू हा गौरव ढवळे नावाच्या मित्रासह अड्ड्याकडे जात होता. आरोपींनी नाईक तलाव, राऊत चौकाजवळ त्याला अडवले. तलवार, कुकरी, चाकू, गुप्तीने सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतरच आरोपी तिथून पळाले. गौरवने स्थानिकांच्या मदतीने पिंटूला मेयो रुग्णालयात नेले. पण, तोवर फार उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जलदगतीने तपासचक्रे फिरवीत आरोपींना अटक करण्यात आली.
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची दखल घेत त्याच्याविरुद्ध दोनवेळा हद्दपार व स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. कारवायांनंतरही गुन्हेगारीपासून परावृत्त करणे पोलिसांना शक्‍य झाले नाही. पाचपावलीतील छोट्या-मोठ्या दुकानदारांकडून खंडणी वसुली करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
जुगाराच्या पैशातून वाद
सुमारे सहा महिन्यांपूर्वी कारागृहातून जामिनावर सुटून आल्यानंतर पिंटूने जुगार अड्डा सुरू केला होता. सागर या अड्ड्यावर कामाला होता. दिवाळीदरम्यान जुगारातील पैशांच्या कारणावरून आरोपी सागर आणि सीताराम यांचा पिंटूसोबत वाद झाला होता. त्यांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली होती. पिंटू कधीही घात करील अशी आरोपींना भीती होती. त्यातूनच पिंटूचा काटा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com