जावयाकडूनच लाखोंची खंडणी वसूल

Santosh-Aambekar
Santosh-Aambekar

नागपूर - कुख्यात डॉन संतोष आंबेकरने नातेवाइकांनासुद्धा सोडले नाही. भाचेजावयाकडूनसुद्धा त्याने लाखोंची खंडणी वसूल केली. भाचेजावयासह दोघांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी संतोष आंबेकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणीखोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. नव्या गुन्ह्यांमुळे आंबेकरच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.

अभिजितनगर, मंगलदीपनगर, बेसा रोड येथील रहिवासी अरविंद यादव (35) हे संतोष आंबेकरचे भाचेजावई आहेत. यादव यांना उमरेड तालुक्‍यातील बेलगावमध्ये 1.23 आर हेक्‍टर शेतजमीन खरेदी करायची होती. कमी पडणारे 20 लाख रुपये यादव यांनी आंबेकरकडून घेतले. प्रारंभी आंबेकरने जमिनीत भागीदार करून घेण्यासाठी दबाव निर्माण केला. त्यानंतर महिनाभराच्या आत व्याजासह पैसे परत करण्याचा तगादा लावला.

भीतीपोटी यादवने व्याजासह 22.50 लाख परत केले. पण, त्याने आंबेकरचे समाधान झाले नाही. धमकावून आणखी 3.60 लाख वसूल केले. त्यानंतर काहीच दिवसांत पुन्हा व्याजाचे 15 लाख शिल्लक असल्याचे सांगून ते देण्यासाठी दबाव टाकणे सुरू केले. त्या रकमेपोटी आंबेकरचे साथीदार राजू अरमरकर व नीलेश केदारने यादव यांचे घर गहाण गहाण ठेवून घेत 10 लाख रुपये 3 टक्के व्याजाप्रमाणे देऊन कर्जाचा बोजा 25 लाखांपर्यंत वाढविला, शिवाय मासिक व्याजापोटी 75 हजार रुपये जिवे मारण्याची धमकी देऊन वसूल केले. डॉनभोवती कारवाईचे पाश आवळताच यादव यांनीही हिंमत करून तक्रार दिली.

याचप्रमाणे हिवरीनगर ले-आउट, पूनम मॉलसमोरील रहिवासी मयूर शांतीभाई मोनपरा पटेल (34) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष आंबेकर, त्याचे भाचे नीलेश व शैलेश केदार यांनी जून 2017 मध्ये विश्‍वासात घेऊन घराला लावण्यासाठी टाइल्स हवे असल्याचे सांगितले. पटेल यांनी आपल्या जावयाकडून 9.30 लाखांच्या टाइल्स घेऊन दिल्या. पण, आरोपींनी कोणताही मोबदला दिला नाही. मोबदल्याबाबत विचारणा करताच आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. या शिवाय शैलेशने बळजबरीने 50 हजार पटेलला व्याजाने घेण्यास भाग पाडले. जास्त व्याज लावून ते परत मिळण्यासाठी ठार मारण्याची धमकी दिली. दोन्ही प्रकरणांमध्ये लकडगंज पोलिसांनी खंडणीखोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी डॉन आंबेकरची संपत्ती जप्त करणे सुरू करताच त्याच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com