डॉन आंबेकरचे रिपोर्ट नॉर्मल तरीही उपचार?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 October 2019

नागपूर : गुजरातमधील व्यापाऱ्याला पाच कोटींनी गंडा घालून एक कोटीची खंडणी मागणाऱ्या झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकर याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये दाखल असून उपचार घेत आहे. मात्र, एमआरआय रिपोर्ट नॉर्मल असूनसुद्धा आंबेकर उपचार घेत असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे व्यापारी जिगरभाई पटेल यांना मुंबईतील भूखंड विक्री व्यवहारात डॉन संतोष आंबेकरने बनावट कागदपत्रे तयार करून पाच कोटी घेतले तर एक कोटींची खंडणी मागितली. या प्रकरणी सीताबर्डीत गुन्हा दाखल असून आतापर्यंत डॉन आंबेकर व त्याचा भाचा नीलेश केदार याला अटक करण्यात आली. तर गुजरात आणि मुंबईतील हवाला व्यापाऱ्याकडे काम करणारे नोकर अजय पटेल आणि सूरज पटेल (अंकलेश्‍वर) यांना गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांचे बयाण पोलिस घेत आहेत. दरम्यान, आंबेकर याचा पीसीआर गुन्हे शाखेने घेतला. आंबेकर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे त्याचा खरपूस समाचार घेण्यात आला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे नाटक त्याने केले. गेल्या तीन दिवसांपासून तो मेडिकलमध्ये उपचार घेत आहे. 
निलेशला अटक केल्यानंतर तपासात गती येणार तोच आंबेकरने भोवळ येण्याचे नाटक सुरू केले. शुक्रवारी आंबेकर आणि निलेशचा पीसीआर समाप्त होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फसवणुकीचा मास्टरमाइंड नाशिकचा रमेश पाटील हा अचानक बेपत्ता झाला आहे. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची चार पथके रवाना झाली आहेत. रमेश पाटीलला अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठा खुलासा होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: don santosh ambekar