डॉन संतोष आंबेकरकडे 500 कोटींची संपत्ती?

डॉन संतोष आंबेकरकडे 500 कोटींची संपत्ती?

नागपूर : कुख्यात झोपडपट्‌टी डॉन संतोष आंबेकर हा जवळपास 500 कोटी रुपये किंमत असलेल्या संपत्तीचा मालक असून, ती संपत्ती त्याने नातेवाईक, नोकर, टोळीतील मुले तसेच गुन्हेगारी जगतातील कौटुंबिक संबंध असलेल्या नंबरकारींच्या नावे केली असल्याची चर्चा आज शहरात आहे. मात्र, गुन्हे शाखेने आंबेकरची सर्व संपत्ती हुडकून जप्त करण्याचा सपाटा सुरू केला आहे. 
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-मुंबईसह अन्य राज्यांत दहशतीच्या बळावर खंडणी, हवाला व्यापार आणि वसुली करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या संतोष आंबेकरला "फिटविण्याची' तयारी सुरू केली आहे. त्याची दहशत संपवून गुन्हेगारीमुक्‍त आणि भयमुक्‍त शहर निर्माण करण्याकडे पोलिसांनी वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी पोलिसांनी संतोष आंबेकरला चारही बाजूंनी घेरले आहे. सुरुवातीला त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात पायी चालवीत त्याची वरात काढली. त्यानंतर त्याची जवळपास पाच कोटींची संपत्ती जप्त केली. त्याच्या अवैध धंद्यांची माहिती बाहेर काढत त्याची प्रेयसी जुही चंदनसह आठ जणांवर मोक्‍का कारवाई करण्यात आली. तसेच त्याच्यावर एका डॉक्‍टर तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आता अनेक पीडितांनी आंबेकरविरुद्ध उघडपणे समोर येऊन तक्रारी देणे सुरू केले आहे. संतोष आंबेकर फक्‍त गुंडगिरीच्या बळावर व्यापाऱ्यांकडून खंडणी आणि हवालातून पैसा कमवीत असून, त्याच्याकडे आतापर्यंत जवळपास 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याची माहिती आहे. त्याचे मुंबई, गोवा येथे रिसॉर्ट आणि हॉटेल्स आहेत. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, अजमेर आणि दिल्लीत काही भूखंड तसेच काही प्रॉपर्टी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेकांना दमदाटी करून कोट्यवधी किमतीचे भूखंड 2 ते 5 लाख रुपये माथी मारून बळजबरीने नातेवाईक आणि नंबरकाऱ्यांच्या नावे केल्याची माहिती पुढे येत आहे. यासोबत त्याचे जुगारअड्‌डे आणि फार्महाउसही असल्याची माहिती आहे. आंबेकरने मुंबईतील त्याची प्रेयसी जुही चंदन हिच्या नावावर तसेच तिच्या नातेवाइकांच्या नावावर मुंबईत अनेक ठिकाणी प्रॉपर्टी घेतल्याची चर्चा आहे. 
चहावाला संत्याचा झाला डॉन 
संतोष आंबेकरचे वडील एका सोनाराच्या दुकानासमोरील रस्त्यावर पाटी टाकून दागिन्यांना पॉलिश करण्याचे काम करीत होते. तर संतोष त्यांना मदत करीत होता. केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर संतोष एका सोनाराच्या शिफारशीने हॉटेलमध्ये कपबश्‍या धुणे आणि चहा देण्याचे काम करीत होता. त्यानंतर तो 1999 मध्ये एका जुगार अड्ड्यावर बिडी-सिगारेट आणि पाणी पाजण्याचे काम करीत होता. दरम्यान, त्याने एका गुंडाचा मित्राच्या मदतीने खून केला आणि तेव्हापासून तो गुन्हेगारी जगतात ओळखला जाऊ लागला. आज त्याच्या नावावर 30 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चारवेळा मोक्‍का लागला आहे. चहावाल्या संत्या आज कोट्यवधीचा मालक असून डॉन म्हणून ओळखला जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com