अधिकाऱ्यांने दिला दम, तपासल्याशिवाय तक्रारी करू नका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नागपूर : विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या अनेक घटना समोर आल्या असतानाही अधिकाऱ्यांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तपासल्याशिवाय तक्रारी करू नका, असा उलट दम अधिकाऱ्यांकडून तक्रार करणाऱ्यांना देण्यात येत असल्याची माहिती आहे. 

नागपूर : विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या अनेक घटना समोर आल्या असतानाही अधिकाऱ्यांकडून तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. तपासल्याशिवाय तक्रारी करू नका, असा उलट दम अधिकाऱ्यांकडून तक्रार करणाऱ्यांना देण्यात येत असल्याची माहिती आहे. 
शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासोबत त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. शासकीय, अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना वरण, भात, वाटाणा भाजी देण्यात येते. याचा चांगला परिणामही मध्यंतरीच्या काळात दिसून आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. खासगी पुरवठादाराकडून आवश्‍यक साहित्य पुरविण्यात येत होते. मध्यंतरी जेवणाचा स्तर योग्य नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. त्यानंतर महिला बचतगटांकडे याचे कंत्राट देण्यात आले. आता सेंट्रलाईज किचनच्या माध्यमातून हा पुरवठा करण्यात येत आहे. 
मध्यान्ह भोजनामध्ये अळ्या, सोंडे, किडे आढळल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. या जेवणामुळे विद्यार्थ्यांना विषबाधाही झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनाला कट लावून शिक्षकच चवदार भोजन मागवून घेत असल्याचेही समोर आले आहे. भोजनासंदर्भात येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. मात्र, पोषण आहार अधिकाऱ्यांकडून या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येत नसल्याची माहिती आहे. 
तक्रार करणारेच ठरतात लक्ष्य 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोषण आहारबाबत अधिकाऱ्यांकडून तक्रारी आल्यास ती उडवून लावण्यात येते. विद्यार्थ्यांची तक्रार नाही. त्यांची प्रकृती बरी आहे. आहार तपासून घ्या. उगाच तक्रार करू नका, असा उलट सल्ला अधिकाऱ्यांकडून तक्रार करणाऱ्यास देण्यात येते. या तक्राराची माहितीही शाळांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येते. तक्रार करणारेच लक्ष्य ठरत असल्याने अनेकांनी तक्रार करणे बंद केल्याचे सांगण्यात येते. तक्रारी कमी असल्याचे सांगून अधिकारी पाठ थोपटून घेत आहेत. 
"अर्थपूर्ण' संबंधामुळेच दुर्लक्ष! 
पुरवठादार, शाळेचे अधिकारी आणि पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या "अर्थपूर्ण' संबंधामुळेच तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट जेवणासाठी अप्रत्यक्षरित्या अधिकारीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't complain without checking