सावधान! खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकताय? पोलिसांची आहे नजर

मिलिंद उमरे
Saturday, 26 September 2020

थुंकीतून कोरोनाचा प्रसार होतो. जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर खर्रा, तंबाखू, पान खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे.

भामरागड (जि. चंद्रपूर) : कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला आहे, तरी लोकांचे खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकणे काही बंद होत नाही. रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे अशा सवयींमुळे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतोच आहे. शेवटी पोलिसांनी अशा व्यक्तींविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.

खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकल्याने कोरोना विषाणूच्या प्रसाराला वेग मिळतो. त्यामुळे पोलिस विभाग, नगरपंचायत व मुक्तिपथने संयुक्तरित्या शहरात मोहिम राबवून खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १२ जणांना महागात पडले असून त्यांच्याकडून २ हजार ५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच जनजागृती करीत सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे आवाहनदेखील करण्यात आले.

थुंकीतून कोरोनाचा प्रसार होतो. जिल्ह्यात रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर खर्रा, तंबाखू, पान खाणाऱ्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनातर्फे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असे आवाहन वेळोवेळी केले जात आहे.

तरीसुद्धा नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर विशेष पथकाच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. प्रशासनाने शहरातील प्रवेशद्वारावर मोहीम राबवत खर्रा खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १२ जणांकडून २ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक! महिला बेपत्ता होण्यात महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा

थुंकीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होतो. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका, अशी जनजागृतीदेखील प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पोलिस निरीक्षक संदीप भांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पडळकर, नगरपंचायतीचे कर्मचारी बारसागडे, रवी गुडीपाखा, मनीष मडावी, पोलिस ठाण्याचे कर्मचारी व मुक्तिपथ चमू सहभागी झाले होते.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont spit kharra otherwise