विदेशी प्रशिक्षकांमुळे "डोपिंग'चा शिक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नागपूर - आता सुमार प्रशिक्षकामुळे प्रतिभावंतांची खाण असूनही ऍथलिट, जिम्नॅस्टिकमध्ये देशाची घसरण झाली आहे. विदेशी प्रशिक्षकांनी तर या देशातील खेळाचा खेळखंडोबा केला. किंबहुना त्यांच्यामुळेच देशात "डोपिंग'चा शिरकाव झाला अन्‌ आपल्यावरही शिक्का बसला, असा घणाघात ख्यातनाम धावपटू पद्मश्री मिल्खासिंग यांनी केला.

नागपूर - आता सुमार प्रशिक्षकामुळे प्रतिभावंतांची खाण असूनही ऍथलिट, जिम्नॅस्टिकमध्ये देशाची घसरण झाली आहे. विदेशी प्रशिक्षकांनी तर या देशातील खेळाचा खेळखंडोबा केला. किंबहुना त्यांच्यामुळेच देशात "डोपिंग'चा शिरकाव झाला अन्‌ आपल्यावरही शिक्का बसला, असा घणाघात ख्यातनाम धावपटू पद्मश्री मिल्खासिंग यांनी केला.

एका स्पर्धेच्या पुरस्कार वितरणासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी प्रशिक्षकांवर प्रहार केला. ऍथलिट असो वा कुठलाही खेळ, प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. देशात चांगल्या प्रशिक्षकांमुळे मी, पी. टी. उषासारखे ऍथलिट घडले. परंतु, विविध खेळाचे प्रशिक्षक मोठे वेतन घेऊनही जबाबदारी पार पाडत नाहीत. मुळात प्रशिक्षकांना कंत्राटी पद्धतीवर घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केवळ मोठमोठ्या चर्चेने खेळाडू घडणार नाही. अखिल भारतीय शालेय स्पर्धातून प्रतिभा पुढे येतात. यातील 10 ते 12 वर्षांच्या उदयोन्मुख खेळाडूंची निवड करून त्यांना आठ वर्षांपर्यंत "स्पोट्‌स कॅम्पस'मध्ये ठेवावे. सरकारने त्यांचा शिक्षण, खाणे, राहण्याचा खर्च करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली असल्याचेही ते म्हणाले.

देशातील प्रतिभावंत खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याच्या आवश्‍यकतेवरही त्यांनी भर दिला. यासाठी त्यांनी चीनचे उदाहरण देत तेथे आठ वर्षे एखाद्या खेळाडूवर मेहनत घेतली जात असल्याचे ते म्हणाले. क्रीडा संघटनांमध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाबाबत ते म्हणाले, आपल्याकडे कुठल्याही संघटनेसाठी निवडणुकीची प्रक्रिया आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाला आळा घालणे कठीण असल्याचे नमूद करीत ज्या खेळाडूंनी खेळासाठी सर्वस्वाचा त्याग केला, अशा खेळाडूंना राजकारण्यांनी सोबत घ्यावे, असेही ते म्हणाले.

नव्वदीतही "फिटनेस'चा सांगितला मंत्र
नव्वदीकडे वाटचाल करीत आहे; परंतु आजपर्यंत डॉक्‍टरकडे गेलो नाही. नियमित जॉगिंग हेच फिटनेसचे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले. जॉगिंग उत्तम आरोग्याचे टॉनिक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Doping of the seal