नागपूर - हुंड्यासाठी युवकाने मोडले लग्न 

अनिल कांबळे
बुधवार, 16 मे 2018

नागपूर : युवक-युवतीची पसंती झाली. दोघांचाही लग्नास होकार. लगेच बार उडवून टाकायचा म्हणून झटपट साखरपुडा करण्यात आला. त्यानंतर पत्रिका छापून वाटण्यात आल्या. नातेवाईकांपर्यंत पत्रिकाही पोहचल्या. लग्न काही दिवसांवरच आलं. परंतु नवरदेव आणि त्याच्या आई-बहिणीने पाच लाख रूपये हुंड्यांची मागणी केली. हुंडा न दिल्यास लग्न करण्यास नकार दिला.

वधूपित्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे जुळलेला विवाह मोडण्यात आला. त्यानंतर वधूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नवरोबाला अटक केली. सध्या हुंडा मागणारा नवरोबा मध्यवर्ती कारागृहात गेल्यानंतर बोहल्यावर चढण्याची तयारी दर्शवित आहे. धीरज रवींद्र मेश्राम (25,रा. यशोधरानगर, अमरावती) असे आरोपीचे नाव असून त्याचे वडील रवींद्र मेश्राम, आई प्रतिभा मेश्राम आणि बहिण दीप्ती मेश्राम यांनाही प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

राजेश गौरीशंकर वासनिक (53, रा. साधू मोहल्ला, इंदोरा, जरीपटका) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांची 27 वर्षीय मुलगी उच्चशिक्षित आहे. तर आरोपी धीरज हा हैदराबाद येथील भेल कंपनीत नोकरीला आहे. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी फिर्यादीची मुलगी बघितली व विवाह निश्‍चित केला. त्याकरिता 18 फेब्रुवारी 2018 ला दोन्ही कुटुंबियांनी साखरपुडा केला. त्यानंतर 3 जून ही विवाहाची तारीख ठरली. मुलीच्या कुटुंबियांनी लग्नपत्रिका छापली व नातेवाईकांमध्ये वितरितही केली.

दरम्यान काही दिवसांपूर्वी धीरज व त्याच्या आईवडिलांनी मुलीच्या वडिलांशी संपर्क केला. यावेळी त्यांना मुलगी तिरळी असून तिचे डोळे बारिक असल्याचे सांगितले. त्यामुळे हा विवाह होऊ शकत नाही. विवाह करण्यासाठी त्यांना पाच लाख रुपये मागितले. अन्यथा विवाह मोडण्याची धमकी दिली. मात्र, वासनिक यांनी हुंडा देण्यास नकार दिला व पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार मनोहर पाटील यांनी भादंविच्या 420 आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करून नवरोबा धीरज याला अटक केली. 

Web Title: for dowry a young boy breaks marriage