डॉ. भट्टड मृत्यू प्रकरण : मसाजवाला, मोबाईल सापडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

दर्यापूर (जि. अमरावती) : दर्यापुरातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र भट्टड यांच्या मृत्यूची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, दर्यापूर पोलिसांना या मृत्यूबाबत चौकशी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काल, सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करीत बयाण दाखल केल्यावर अन्य साथीदारांचीही चौकशी झाली. गळफास घेण्याचा दबाव त्यांच्यावर कोणत्या कारणामुळे आला, याचा तपास सुरू आहे. कुटुंबीयांच्या चौकशीत विशेष काही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आता पोलिस वेगळ्या पद्धतीने चौकशी करण्याच्या मानसिकतेत आहेत.

5 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन मृत्यू झालेल्या डॉ. भट्टड यांनी सकाळी काही रुग्णांना तपासले होते. हॉस्पिटलच्या वॉर्डातही फिरून भरती असलेल्या रुग्णांची तपासणी केली. यानंतर नियमित येणारा मसाजवाला आल्याने ते आपल्या खोलीत गेले. तेथून त्यांचा मृतदेहच बाहेर आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मसाज करणाऱ्या व्यक्तीचे बयाण घेण्याचे ठरविले. मात्र, पोलिस जेव्हा या व्यक्तीला शोधायला गेले तेव्हा मात्र तो गायब असल्याचे लक्षात आले. आज, मंगळवारी दुपारी दर्यापूर पोलिसांना हा व्यक्ती सापडला आहे. त्याचे नाव खन्ना असल्याचे पोलिसांनी सांगितले. दर्यापूर पोलिसांनी त्याची कसून चौकशी करीत बयाण नोंदवून घेतले आहे. मात्र, यातून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले नाहीत.
मृत्यूपूर्वी माफीचा संदेश पाठविणारा डॉ. भट्टड यांचा मोबाईलदेखील गायब असल्याची बाब पुढे आली होती. या मोबाईलमध्ये मृत्यूपूर्वी कुणाशी बोलणे झाले किंवा धमकी वगैरेचे काही मेसेज आलेत का, याची तपासणी होणे गरजेचे होते. यातील कॉल रेकॉर्डही अतिशय महत्त्वाचा दुवा होता. मृत्यूनंतर दर्यापूर पोलिसांना हा मोबाईल सापडला नव्हता. तोसुद्धा पोलिसांना मिळाला आहे.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर भट्टड यांच्या ड्रायव्हरने दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवल्याने त्याचाही शोध पोलिस घेत होते. हा डीव्हीआर आता पोलिसांना मिळाला आहे. मात्र, त्याचा पासवर्ड कुणालाही माहिती नसल्याने नवा पेच निर्माण झाला. याकरिता अमरावती येथून काही तज्ज्ञ लोकांना याचा पासवर्ड शोधण्याकरिता बोलावले असल्याची माहिती आहे.
दर्यापूर पोलिस कसून शोध घेत असून यातून भट्टड यांच्या मृत्यूचे कोणते गूढ बाहेर येते, यावर दर्यापूरकरांचे लक्ष लागले आहे.
मित्र परिवारातील चर्चेनुसार डॉ. भट्टड यांनी मृत्यूपूर्वी एलआयसीच्या पॉलिसी घेतल्या असून, त्या कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या पॉलिसीचा लाभ देण्यासाठी त्यांनी कुणाला नॉमिनेट केले आहे, हे समजू शकले नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Bhatad Death Case: Massagewala, Mobile found