डॉ. मोहन भागवत  म्हणतात, आठ हजार वर्षांनंतरही लोक रामाचे अस्तित्व विचारतात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

नागपूर  : माणसाने रामासाखरे आचरण करावे, तर तो रामालाच देवघरात ठेवून वाटेल तसे वागतो. म्हणून रामजन्मभूमी प्रकरणात आठ हजार वर्षांनंतरही श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत प्रश्‍न विचारणे होते, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 

नागपूर  : माणसाने रामासाखरे आचरण करावे, तर तो रामालाच देवघरात ठेवून वाटेल तसे वागतो. म्हणून रामजन्मभूमी प्रकरणात आठ हजार वर्षांनंतरही श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत प्रश्‍न विचारणे होते, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 

रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी महोत्सवात डॉ. मोहन भागवत बोलत होते. यावेळी जन्मशताब्दी सोहळा समितीच्या अध्यक्ष माजी खासदार सुमित्रा महाजन व संयोजक विरजेश उपाध्याय उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, रामाचे अस्तित्व अनुभवणारे लोक आहेत. तरीही लोक प्रश्‍न विचारतात. कारण रामाप्रमाणे आचरण करायचे सोडून लोक वाटेल तसे वागतात. कालचा भारत वेगळा होता. आजचा त्याहून वेगळा असून, उद्याचा अजूनच वेगळा असेल. काळानुरूप स्थिती ओळखून आपल्याला आचरण सुधारावे लागेल, असे डॉ. भागवत म्हणाले. 

दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवन कार्यावर बोलताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत घनिष्ट संबंध ठेवणारे दत्तोपंत नेहमीच प्रत्येकासोबत समरसतेने वागले असून, त्यांचे समरस भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचे भागवत म्हणाले. तर सुमित्रा महाजन यांनी अयोध्या प्रकरणातील रामजन्मभूमी आंदोलनातील मातृशक्‍तीची भूमिका या विषयावर भाष्य केले. अयोध्या प्रकरणातही मातृशक्‍तीचा मोठा सहभाग होता, अशी आठवण महाजन यांनी करून दिली. अमर कुळकर्णी यांनी वैयक्‍तिक गीत गायले. विरजेश उपाध्याय यांनी प्रास्ताविक केले. आभार अजय पत्की यांनी मानले. 

रामलल्लाला जमीन परत मिळाली 
अयोध्या प्रकरण मार्गी लागल्याने आज प्रचंड आनंद होत आहे. रामलल्लाला त्याची जमीन परत मिळाली. असे बोलूनच सुमित्रा महाजन यांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ केला. विशेष म्हणजे आयोजन समितीचे सदस्य या नात्याने मुरली मनोहर जोशी कार्यक्रमाला उपस्थित होते. 

संपूर्ण देशाला फायदा ः जोशी 
रामजन्मभूमी प्रकरणाच्या निकालाचा फायदा संपूर्ण देशाला होणार आहे. पाच एकर जमिनीच्या निर्णय प्रत्येकाने स्वीकारला असून, न्यायालयाच्या भूमिकेचे देशवासीयांनी स्वागत केले. आगामी काळात मंदिराच्या निर्मितीला वेग येईल. निर्णय स्वागत योग्य आहे, असे मत कार्यक्रमानंतर मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्‍त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Mohan Bhagwat says that after eight thousand years, people still ask about Rama's existence