डॉ. गावंडे मेडिकलचे नवे वैद्यकीय अधीक्षक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नागपूर : रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारींची दखल घेण्यासोबतच रुग्णसेवेची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी मेडिकलमध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आहे. मात्र, तीन वर्षांपासून या कार्यालयात तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रकाशित झाले. याची दखल घेऊन नवीन वैद्यकीय अधीक्षकांची मेडिकलमध्ये नेमणूक करण्यात आली. जनऔषधी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांची या पदावर गुरुवारी (ता.7) नियुक्ती करण्यात आली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गरीब रुग्णांना योग्य उपचार मिळावे, यासाठी विद्यमान अधिष्ठात्यांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ही नियुक्‍ती करण्यात आली. पूर्वी मेडिकलमध्ये रुग्णांच्या तक्रारींचे नियोजन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी कार्यरत होते. वैद्यकीय अधीक्षक आरोग्य विभागाचे असत. त्यांचा प्रशासकीय अनुभव येथे काम येत होता. परंतु, 2010 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागात जुंपली आणि राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजमधून रुजू वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द केली. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय कारभार कोलमडला. अद्याप वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात रुग्णांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केले. अधीक्षक आणि उपअधीक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे वृत्त प्रकाशित होताच मेडिकलमध्ये नवीन वैद्यकीय अधीक्षक नियुक्तीला वेग आला. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी गुरुवारी डॉ. गावंडे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. विद्यमान अधीक्षक डॉ. राजेश गोस्वामी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही नियुक्ती असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले. डॉ. गावंडे यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. New Medical Superintendent of Gawande Medical