डॉ. नितीन राऊत यांनी खेचून आणले "उत्तर'

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः उत्तर नागपुरात सलग पंधरा वर्षे सत्तेवर असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत होते. मात्र 2014 मध्ये "बसप' फॅक्‍टरमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. मिलिंद माने विजयी झाले होते. विशेष असे की, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डॉ. राऊत यांनी यावेळी (2019) खऱ्या अर्थाने विजय खेचून आणत सर्वांना उत्तर दिले. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांचा डॉ. राऊत यांनी पराभव केला.

उत्तर नागपुरात शरीराच्या डॉक्‍टरांना नाकारत साहित्याच्या डॉक्‍टरला समाजाने निवडून आंबेडकरी चळवळीतील कधीकाळी पॅंथर असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला. तर मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले बहुजन समाज पक्षाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तर उत्तरेतील मतदारांनी "वंचित बहुजन आघाडी'च्या उमेदवाराला वंचित ठेवले.

डॉ. नितीन राऊत यांना 86 हजार 821 मते पडली. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना 66 हजार 127 मते पडली. 20 हजार 718 मतांनी डॉ. राऊत विजयी झाली. बसपचे सुरेश साखरे यांना 23 हजार 333 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीपासून भाजपची पिछाडी सुरू होती, ती अखेरपर्यंत कायम राहिली. केवळ पाचव्या फेरीमध्ये हजार मतांनी लीड कमी झाली होती. उत्तर विजयासाठी अटीतटीचा सामना रंगणार असल्याचे चित्र रंगवण्यात आले होते, परंतु यावेळी मात्र, उत्तर मतदारसंघातील मतदारांनी मनात कॉंग्रेसला विजयी करण्याचा निश्‍यच केला होता, असे निकालावरून स्पष्ट जाणवते. गतवर्षी जरीपटका तसेच उत्तरच्या सीमावर्ती भाग असलेल्या कळमना व नारा व इतर परिसरातून मिळालेल्या मतदानामुळे भाजपचा विजय झाला होता. परंतु, यावेळी या भागावर डॉ. राऊत यांनी पकड ठेवल्यामुळे डॉ. राऊतांचा विजय सुकर झाला. विशेष असे की, लोकसभेच्या निवडणुकीत गडकरी यांना मिळालेली आघाडी कायम ठेवण्यात डॉ. माने अपयशी ठरले.

उत्तर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत डॉ. राऊत यांनी 1237 मतांची आघाडी घेतली. डॉ. राऊत यांना पहिल्या फेरीत 5484 मते मिळाली. या वेळी भाजपचे डॉ. माने यांनी 4247 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर होते. तर, बसपचे साखरे यांचा हत्ती 1131 मतांवर थांबला. दुसऱ्या फेरीतही डॉ. राऊत यांनी 2211 मतांची आघाडी कायम राखली. तिसऱ्या फेरीतही डॉ. राऊत यांनी 1202 मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीत केवळ 650 मतांची आघाडी राऊत यांनी घेतली आणि त्यानंतर पाचव्या फेरीत डॉ. माने यांना 2 हजार 100 मतांची आघाडी मिळाल्यामुळे काही काहीसी चुरस वाढली. मात्र, सहाव्या फेरीत पुन्हा डॉ. राऊत यांनी 1480 मतांची आघाडी घेऊन लीड कायम ठेवली. यानंतर मात्र कॉंग्रेसच्या राऊतांनी पुढे जाण्याचा सिलसिला कायम सुरू ठेवला. अखेरच्या फेरीत डॉ. राऊत यांच्या खात्यामध्ये 86 हजार 821 मतांचा जोगवा गोळा झाला आणि येथेच त्यांचा विजय निश्‍चित झाला.
तर डॉ. माने यांच्या खात्यामध्ये 66 हजार 127 मते पडली. अशाप्रकारे 20 हजार 718 मतांनी डॉ. राऊत यांना निवडणूक अधिकारी यांनी विजयी घोषित केले. भाजपचे डॉ. माने दुसऱ्या तर बसपचे सुरेश साखरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

उत्तरेत हत्ती बसला
उत्तरेत 2014 मध्ये ईव्हीएमतून बसपच्या पदरात भरभरून मताचे दान पडले होते. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना 55 हजार 487 मते पडली होती. मात्र, यावेळी एकाही फेरीत 2 हजार मते पडली नाही. हत्ती केवळ 23 हजार 333 मते घेऊन उत्तरेत बसला. विशेष असे की, आजपर्यंतच्या निवडणुकीत बसपचे प्रदेशाध्यक्षांनी कधीही निवडणूक लढविली नाही. मात्र, साखरे याला अपवाद ठरले. प्रदेशाध्यक्ष असताना निवडणूक लढली आणि हरली.

मागील वर्षाच्या तुलनेत मतदान अधिक
2014 मध्ये भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना 68,905 मते पडली होती. तर बसपचे किशोर गजभिये यांना 55,487 मते मिळाली होती. डॉ. नितीन राऊत यांना मागील निवडणुकीत केवळ 50,042 मतांवर थांबावे लागले होते. मात्र, गत निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत (2019) निवडणुकीत डॉ. राऊत यांना 36 हजार 779 मते जादा मिळाल्याने "उत्तर' आणण्यात मदत झाली.

उमेदवारांना मिळालेले मतदान

-डॉ. नितीन राऊत (कॉंग्रेस)-86,821
-डॉ. मिलिंद माने(भाजप)-66,127
-सुरेश साखरे(बसप)-23,333
-कार्तिक गेंदलालजी डोके (विश्व हिंदू जनसत्ता पार्टी) -295
-ऍड. विजया दिलीप बागडे (आंबेडकराइट पार्टी ऑफ इंडिया)-409
-अर्चना चंद्रकुमार ऊके राष्ट्रीय जनसंभावना पार्टी :215
-जितेश परमानंद रामटेके :अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष-125
-सतीश वासुदेव शेंडे : अपक्ष-200
-यामिनी बंडू देवकर : राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी-114
-शिवप्रसाद कोमलसिंग गोहिया : अपक्ष-227
-कीर्ती दीपक डोंगरे : एआयएमआयएम- 9,318
-ऍड. कैलाश वाघमारे : अपक्ष -689
-विनय पुरुषोत्तम भांगे : वंचित बहुजन आघाडी-5,599
-अमन प्रकाश रामटेके : मायनॉरिटिज डेमॉक्रॅटिक पार्टी- 313
-नोटा -1,986
-एकूण वैध मते : 1,93,785
-अवैध मते : 71
-बदली मतदान : 24
-पोस्टल मतदान : 575 (डॉ. राऊत 244, डॉ. माने-143, सुरेश साखरे 69)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com