डॉ. नितीन राऊत म्हणाले, बहुजन नेतृत्वाचे खच्चीकरण करणे पडले महागात |Election result 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

विदर्भ राज्याचा दिलेला नाराही फोल ठरला. राज्यात भाजपच्या जागाही कमी होत आहेत असे सांगत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर डॉ. राऊत यांनी राज्यात परिवर्तन होणार असल्याची सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. 

नागपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागपुरातील बहुजन नेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून तर सुधाकर कोहळे यांना तिकीट नाकारले. अर्थात बहुजन नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाला. या असंतोषाची पावती म्हणून नागपूर जिल्ह्यात हे चित्र दिसून आले असल्याचे सांगत राज्यातील जनतेला आता परिवर्तन हवे आहे, अशी टीका कॉंग्रेसचे राज्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी येथे केला. 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज 24 ऑक्‍टोबर रोजी जाहीर करण्यात आला. उत्तर नागपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात असलेले डॉ. राऊत विजयी झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे डॉ. राऊत म्हणाले की, राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर विकास, बेरोगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाला बगल देत 370 आणि राष्ट्रवाद या विषयावर सत्ताधाऱ्यांनी जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर "इडी'ची चौकशी लावून दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे जनतेने ओखळले आणि राज्यातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्याचप्रमाणे बावनकुळे, कोहळे यांच्यासह विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारल्याने बहुजन समाजात असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. 
विदर्भाचा नारा फोल 
पाच वर्षांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भाचा विकास करतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यांनी विकास केला नाही. एकही उद्योग नागपुरात आला नाही. विकास तर सोडा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मिहानची पतझड कायम राहिली. विदर्भ राज्याचा दिलेला नाराही फोल ठरला. राज्यात भाजपच्या जागाही कमी होत आहेत असे सांगत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर डॉ. राऊत यांनी राज्यात परिवर्तन होणार असल्याची सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. 

पराभव आनंदाने स्वीकारला आहे. कुठे कमी पडलो याचे मूल्यमापन करणार असून ज्या चुका झाल्या असतील त्या आगामी काळात सुधारण्याचा प्रयत्न करेन. उत्तरेत मोठ्या प्रमाणात विकास झाला. मात्र, जनतेने दिलेला कौल मान्य करीत आहे. उत्तरेतील विजयासाठी डॉ. नितीन राऊत यांना शुभेच्छा. 
-डॉ. मिलिंद माने, माजी आमदार उत्तर नागपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Nitin Raut said