डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा जगभरात ‘लौकिक’

अनुप ताले
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून आजपर्यंत 48 हजार 190 विद्यार्थी पदवीधर झाले असून, त्यांचेपैकी हजारो विद्यार्थी जगभरात कुशल नेतृत्व करीत, देशाला लौकिक मिळवून देत असल्याचे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी सांगितले.

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून आजपर्यंत 48 हजार 190 विद्यार्थी पदवीधर झाले असून, त्यांचेपैकी हजारो विद्यार्थी जगभरात कुशल नेतृत्व करीत, देशाला लौकिक मिळवून देत आहेत. अनेक विद्यार्थी देशांतर्गत क्लासवन, सुपर क्लासवन अधिकारी, शास्त्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातून शेती, शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कृषी ज्ञानाचा उपयोग करीत असल्याचे गौरोद्‍गार डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले.

देशाच्या विकासाचे मूळ आणि सत्य कृषीतच असल्याचे सांगताना, देशातील बेरोजगारी, आर्थिक समस्याचे निराकरण करण्याचे सामर्थ्य फक्त कृषी क्षेत्रामध्येच आहे, असे ठामपणे व्यक्त होत डॉ.विलास भाले यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची महती विषद केली. विद्यापीठाचा आज 34 वा दीक्षांत समारंभ होत असून, त्या निमित्ताने ‘सकाळ’शी खास बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. अनेकांच्या बदलीदानातून निर्मित या कृषी विद्यापीठातून आतापर्यंत हजारो संशोधने झालीत. प्रत्यक्ष शेतीत त्याचे प्रोयग झाले आणि विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या कृषी विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या या विषयावर बोलताना त्यांनी, पिकांमध्ये बदल, वातावरण बदलानुसार शेती, लघुउद्योग, पुरक व्यवसाय, कमी खर्चाची शेती आणि सेंद्रिय उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

Image may contain: plant, sky, house, tree and outdoor

शेती आणि शेतकरी विकासातील बाधा
* हवामानात वेळोवेळी बदल, कीडी, रोगांचा प्रादूर्भाव
* पावसाचा लहरीपणा, पिकांना ताण, अतिपाऊस
* उत्पादन आधारीत भाव मिळत नाही
* शेतकऱ्याच्या मालाचे भाव तिसरा व्यक्ती ठरवतो
* कापूस, सोयाबीन व्यतिरिक्त पिकांचे क्षेत्र कमी
* कापूस, सोयाबीन पिकावर प्रक्रिया उद्योगाला वाव कमी
* कृषी निविष्ठा महागल्या, मजूर मिळत नाहीत, मजुरी अव्वाच्या सव्वा
* गावपातळीवर शेतमाल साठवणूक व्यवस्थेचा अभाव

उपाय, पर्याय व आवश्यकता
* शेतकऱ्याने शेतमालाचा स्वतः भाव ठरवावा
* सहज प्रक्रिया करता येतील, लघू उद्योग करता येतील अशी पिके घ्यावीत
* तृण, दाल, मसाला वर्गीय, तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढवावे
* कमी खर्चाची पिके घ्यावीत, उत्पादन खर्च कमी करण्याचे तत्र शिकावे
* विद्यापीठाच्या यांत्रिक संशोधनाचा वापर करावा
* तण बंदोबस्तासाठी तणनाशकांचा मर्यादेत वापर करावा
* ठिबक सिंचनाचा अवलंब करावा
* फवारणी करताना, सुरक्षा बाळगावी
* सेंद्रिय शेती करण्यासाठी भर द्यावा
* विद्यापीठाच्या संशोधनाचा, शिफारशींचा अवलंब करावा

हे ही वाचा : ...अन् सापडला तूर खरेदीचा मुहूर्त!

 

तणाचा बंदोबस्त करू
तण कापून ते पिकातच पडेल व त्याचे खत होईल. एकाच माणसाद्वारे, कमी खर्चात, योग्य वेळेत तणाचा बंदोबस्त करात यईल, असे यंत्र तयार विद्यापीठाने तयार केले आहे. त्यावर प्रयोग सुरू असून, याद्वारे तणाचा योग्य बंदोबस्त करू, असा विश्वास डॉ.भाले यांनी व्यक्त केला.

कापूस वेचणीचा समस्या निकाली काढू
विदर्भात कापूस पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने व मजुरी अव्वाच्या सव्वा असल्याने कापूस वेचणीची समस्याही तेवढीच मोठी आहे. या समस्येवर उपाय म्हणून, अत्यल्प खर्चात यांत्रीकिकरणाद्वारे कापूस वेचणीसाठी संशोधन सुरू असून, या तंत्रज्ञानातून लवकरच कापूस वेचणीची समस्या निकाली काढू, अशी माहिती डॉ.विलास भाले यांनी दिली.

गुलाबी बोंडअळीला केले ‘परास्त’
2017-18 मध्ये गुलाबी बोंडअळीने कापूस पिकावर हल्ला चढवून विदर्भात थैमान घातले होते. मात्र विद्यापीठाने मिशन मोडवर काम करीत गुलाबी बोंडअळीला परास्त केले आहे. दोन वर्षात 10 टक्क्यांपेक्षा कमी प्रादूर्भाव झाला आहे. त्यासाठी वर्षभर आवश्यक माहितीची जनजागृती करण्यासाठी गावोगावी प्रात्याक्षिके दिलीत. फेरोमेन ट्रॅप डेव्हलप केले, सोलर ट्रॅप तयार केले. फरदळ न घेण्याची जनजागृती केली. फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी योग्य तंत्राची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली आणि दोन वर्षात गुलाबी बोंडअळीवर 90 टक्के कंट्रोल मिळविल्याचे त्यांनी सांगितले.

सेंद्रिय शेतीसाठी मोठे योगदान
विद्यापीठ दहा वर्षापासून सेंद्रिय शेतीवर काम करीत आहे. या कामामुळे राज्यातील चारही विद्यापीठांना पाच कोटीचे अनुदान मिळाले. राज्याला जैविक मिशन मिळाले. देशी वाणामध्ये आता सेंद्रिय शेती कशी आणता येईल, सेंद्रिय उत्पादनाचे मार्केट कसे करता येईल, त्यावर दोन वर्षापासून अभ्यास सुरू आहे. काही वाण होऊ घातले असून, पोखरा, जैविक मिशनच्या माध्यमातून विद्यापीठ राज्यभरात सेंद्रिय शेती उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन वर्षातील उपलब्धी
* आठ मोठ्या तळ्यांच्या निर्मितीतून 350 हेक्टर क्षेत्र आलिताखाली आणले.
* राज्याला डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन मिळाले.
* राज्यात पहिल्यांदाच रंगीत कापसाचे उत्पादन विद्यापीठात.
* 36 विद्यार्थींची जीआरएफ मध्ये निवड झाली.
* पीएचडीसाठी 17 विद्यार्थांना फेलोशिप मिळाली.
* विद्यापीठाचे 400 विद्यार्थी बँकेत नोकरीवर लागले.
* 40 विद्यार्थी क्लास वन अधिकारी बनले.
* ‘स्किल डेव्हलपमेंन्ट’च्या माध्यमातून राज्यात पहिले पारितोषीक.
* कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी अभ्यासक्रम सुरू केला.
* मूल व यवतमाळमध्ये एक-एक महाविद्यालय सुरू केले.
* ज्वार संशोधन केंद्र राज्यात तर, कापणीपश्चात संशोधन केंद्र देशात उत्कृष्ट ठरले.

विद्यापीठाच्या एकूण उपलब्धी
* 11 आंतरराष्ट्रीय, 24 राष्ट्रीय व 47 स्थानिक संस्थांसोबत एकूण 82 करार केले.
* देशातील पहिले ‘शावक सृष्टी’ सुपर कंम्प्यूटर विद्यापिठाला यावर्षी प्राप्त झाले.
* 173 पिकांच्या जाती व 1418 तंत्रज्ञान विकसीत केले आहे.
* 32 प्रकारचे शेती व शेती उपयोगी औजारे विकसीत केले.

संभावित उपलब्धी
* सिंधवाई येथे फॉरेस्ट्री व बुलडाण्यात कृषी महाविद्यालय प्रस्तावित.
* सेंद्रिय तपासणीसाठी लॅब प्रस्तावित.
* तेलबिया उत्पादन वाढीसह ऑईल मिल शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देणार.
* विविध रंगाचे कापूस उत्पादन घेण्यासाठी संशोधन सुरू.
* हळदीमध्ये कुरकुमीन वाढविण्यासाठी संशोधन सुरू.
* खारपान पट्यावर आधारीत संशोधन व पर्याय देणार.
* प्रत्येक पिकासाठी ल्यूर डेव्हलप करुन कीड नियंत्रण करणार.

शासनाकडून अपेक्षा
* प्रत्येक तालुक्यात ‘बायोकंट्रोल लॅब’ तयार करण्यासाठी अनुदान मिळावे.
* ऑरगॅनिक सर्टिफिकेशन देण्याची परवाणगी मिळावी.
* मजुरांच्या 600 जागा एकदा सिनॅरिटीनुसार भरण्याची मंजूर मिळावी.
* विद्यापीठाच्या दोन प्रक्षेत्रांना भींती बांधण्यासाठी अनुदान मिळावे.
* विद्यापीठाच्या शासनाकडील लोकाभिमूख प्रस्तावांना मंजूरी मिळावी.
* सर्वच कुलगुरूंच्या खर्च मर्यादेत किमान 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Panjabrao Deshmukh Agriculture University Worldwide reputation